कराळे मास्तर, रविराज साबळेंनी प्रस्थापितांची गणितं कशी बिघडवली?

विधान परिषद निवडणूक 2026 मध्ये दोन अपक्ष उमेदवारांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून नितेश कराळे मास्तर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात रविराज साबळे यांनी प्रस्थापितांना जोरदार टक्कर दिली.

ADVERTISEMENT

MLC Elections 2026
MLC Elections 2026
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक 2026

point

प्रस्थापित पक्षांविषयीची नाराजी आहे का?

MLC Elections 2026 : नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या पाच जागांच्या निकालांनी राजकारणात अनेक नवीन चर्चांना तोंड फोडले आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रस्थापित आघाड्यांकडे हत्तीसारखी अवाढव्य राजकीय ताकद, पैसा, संघटना आणि यंत्रणा होती, तरीही या बलाढ्य प्रस्थापितांसमोर अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या काही तरुणांनी उभे राहून दिलेली टक्कर सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. जंगलातील एका गोष्टीत जसा एक मदमस्त हत्ती इतर प्राण्यांना त्रास द्यायचा आणि शेवटी एका लहानशा मुंगीने त्याच्या कानात घुसून त्याला सळो की पळो करून सोडले होते, अगदी तसाच प्रकार या निवडणुकीत पाहायला मिळाला. राजकारणातील ‘हत्तीरूपी’ प्रस्थापित नेत्यांविरोधात सर्वसामान्य जनतेच्या व तरुणांच्या मधून उठलेला हा एक ‘मुंगीसारखा’ छोटा पण अत्यंत प्रभावी आवाज ठरला आहे.

प्रस्थापितांविरोधात लढा

नागपूर पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी झाले, तर भाजपचे सुधाकर कोहळे यांचा पराभव झाला. मात्र, या निवडणुकीत खरी रंगत आणली ती नितेश कराळे ऊर्फ कराळे मास्तर यांनी. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, विदर्भातील साध्या कुटुंबातून आलेल्या आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आपल्या अनोख्या शैलीत शिकवणाऱ्या कराळे मास्तरांनी अपक्ष अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार) त्यांची हकालपट्टी केली, तरीही न डगमगता त्यांनी प्रस्थापितांविरोधात लढा दिला. या निवडणुकीत त्यांना तब्बल 24,249 पहिल्या पसंतीची मते मिळाली आणि ते मतमोजणीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 

हे ही वाचा : अर्णब चक्रीवादळानंतर नवी प्रणाली सक्रिय, राज्यात कुठे पावसाचा इशारा?

रविराज साबळे यांची ताकद

दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून संगणक अभियंता असलेल्या आणि शेतीविषयक प्रश्नांवर आक्रमक बोलणाऱ्या रविराज साबळे पाटील यांनी आपली ताकद दाखवून दिली. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) प्रतापसिंह पाटील विजयी झाले, तर माजी आमदार सतीश चव्हाण पराभूत झाले. या निवडणुकीत कोणतीही मोठी संघटना किंवा राजकीय पाठबळ नसताना रविराज साबळे यांनी 19,835 पेक्षा जास्त मते मिळवत प्रस्थापितांना मोठा धक्का दिला.

हे ही वाचा : महाराष्ट्रात दररोज सरासरी 8 शेतकऱ्यांची आत्महत्या, RTI मधून धक्कादायक माहिती समोर, 2022 पासून काय घडलं?

प्रस्थापितांबद्दलचा वाढता अविश्वास

कराळे मास्तर आणि रविराज साबळे यांच्यासारख्या अपक्ष चेहऱ्यांच्या मागे हजारो मतदार उभे राहण्यामागे प्रस्थापितांबद्दलचा वाढता अविश्वास हे मुख्य कारण मानले जात आहे. प्रस्थापित नेते आपल्या संस्था, कारखाने आणि स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी कधीही भूमिका बदलू शकतात, अशी भावना तरुण मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच प्रस्थापित नेते आब राखून केवळ राजकीय आंदोलने करतात, तर हे तरुण नेते थेट रस्त्यावर उतरून सामान्यांचे, तरुणांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात. 

हे ही वाचा : 'फेकनाथ मिंधेला एवढी हिंमत असती ना तर...', आदित्य ठाकरे ठाण्यात जाऊन शिंदेंवर बरसले!

नेते आणि सर्वसामान्य जनता यांच्यात निर्माण झालेले मोठे अंतर पुसून टाकण्याची इच्छा या मतदानातून दिसून आली आहे. केवळ पैसा, प्रतिष्ठा आणि पक्षाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात हा जुना समज आता बदलताना दिसत आहे. नागपूर असो वा छत्रपती संभाजीनगर, जनतेने प्रस्थापितांना दिलेला हा कौल ही भविष्यातील राजकारणासाठी मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे. जर प्रस्थापित नेत्यांनी वेळीच आत्मपरीक्षण केले नाही, तर आगामी काळात प्रत्येक मतदारसंघात असे 'कराळे मास्तर' आणि 'रविराज साबळे' उभे राहून प्रस्थापितांना आव्हान देतील यात शंका नाही.