'आम्हाला सविस्तर माहिती द्या..', मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांची नोटीस, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil azad maidan protest : मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील प्रस्तावित आंदोलनाबाबत मुंबई पोलिसांनी अधिकृत नोटीस बजावली आहे. आंदोलकांची संख्या, वाहनांचा तपशील आणि स्वयंसेवकांची माहिती देण्यासह आंदोलनाबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांची नोटीस
मुंबईतील आंदोलनाबाबत सविस्तर माहिती द्या, पोलिसांची मागणी
Manoj Jarange Patil Mumbai Protest : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 18 सप्टेंबर 2026 पासून मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन, उपोषण आणि धरणे करण्याबाबत जरांगे पाटील यांनी अर्ज केला आहे. 14 सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या अर्जाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. आंदोलनाबाबतची सविस्तर आणि पूर्ण माहिती तात्काळ सादर करण्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आंदोलनाबाबत सविस्तर माहिती द्या, पोलिसांची जरांगेंना नोटीस
जरांगे पाटील यांच्या अर्जात आंदोलनात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची अंदाजे संख्या, वाहनांचा तपशील, स्वयंसेवकांची यादी, संपर्क क्रमांक आणि इतर माहिती नंतर सादर करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. आंदोलनाच्या वेळेबाबत स्पष्ट माहिती नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे आंदोलनात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नावे, वाहनांचा तपशील, स्वयंसेवकांची यादी, संपर्क क्रमांक आणि इतर परिपूर्ण माहिती कार्यालयात सादर करण्यास पोलिसांनी सांगितले आहे.
जरांगेंच्या वक्तव्यांमध्ये विरोधाभास असल्याचा पोलिसांचा दावा
दरम्यान, 14 सप्टेंबर रोजी प्रसारमाध्यमांसमोर जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांचाही पोलिसांनी नोटीसमध्ये उल्लेख केला आहे. परवानगी नाकारल्यास कोट्यवधी मराठे मुंबईत बेकायदेशीरपणे येणार आहेत. तसेच मुंबईला जाणाऱ्या गाड्या आणि आंदोलकांबाबत दोन दिवस आधी सांगितले जाणार असल्याचे वक्तव्य जरांगेंनी केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या वक्तव्यांवरून नंतरच्या काळात गरजेनुसार आंदोलकांना मुंबईत बोलावले जाणार असल्याचे दिसून येते, असे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, जरांगे पाटील यांच्या अर्जातील माहिती आणि प्रसारमाध्यमांसमोरील वक्तव्यांमध्ये विरोधाभास दिसत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
त्यामुळे आंदोलन सुरू केल्यानंतर आंदोलकांना मुंबईत येण्याचे आवाहन केले जाणार आहे किंवा कसे, याबाबत स्पष्टीकरण देण्यास पोलिसांनी सांगितले आहे. तसेच आवाहन केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या आंदोलकांमुळे जाहिर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, 2025 मधील नियम क्रमांक 6 चा भंग होणार आहे किंवा कसे, याचीही स्पष्टता मागण्यात आली आहे. या सर्व बाबींवर सुस्पष्ट आणि परिपूर्ण माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू भागुजी बिडकर यांनी दिले आहेत.
