'भाडे टट्टू मागे घेतो... पण सुपारीबाज म्हणतो, मिमिक्री आर्टिस्ट...' फडणवीसांनी एवढं का दाखवलं बोलून?
महाराष्ट्र विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर आणि अप्रत्यक्षपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ दरड कोसळल्याने राज्यातील फडणवीस सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावरून झालेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (10 जुलै) विधानसभेत सविस्तर भूमिका मांडली. प्रकल्पाबाबत खोट्या अफवा पसरवून महाराष्ट्राची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. याचवेळी यापूर्वी केलेल्या 'भाडे के टट्टू' या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देत ते मागे घेत असल्याचे सांगितले. मात्र, त्याऐवजी 'भाटक गदर्भ' हा शब्दप्रयोग करत त्यांनी विरोधकांवर पुन्हा टीका केली.
मिसिंग लिंक प्रकल्पावरून फडणवीसांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री म्हणाले की, मिसिंग लिंक प्रकल्पातील केबल-स्टे ब्रिज आणि अत्याधुनिक बोगद्यांना कोणताही तडा गेलेला नाही किंवा कोणतेही संरचनात्मक नुकसान झालेले नाही. असे असतानाही "सहा हजार कोटी रुपये पाण्यात गेले" अशा प्रकारच्या बातम्या आणि अफवा पसरवण्यात आल्या.
हे ही वाचा>> "मुख्यमंत्री आहेस ना तू..", फडणवीसांच्या विधानसभेतील भाषणावरुन राज ठाकरे संतापले
फडणवीस म्हणाले, "हा केवळ माझा अपमान नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांबाबत खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल केली जात आहे."
'भाडे के टट्टू'ऐवजी आता 'भाटक गदर्भ'
आपल्या वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, "मी हिंदीमध्ये 'भाडे के टट्टू' असे बोललो होतो. त्यावर काहींनी आक्षेप घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी अधिक सुसंस्कृत भाषा वापरायला हवी होती, असे सांगितले. त्यामुळे मी ते शब्द मागे घेतो. आता त्याऐवजी 'भाटक गदर्भ' असे म्हणतो. किंवा मराठीत सुपारीबाज.. म्हणतो"
यावेळी त्यांनी उपरोधिक शैलीत पुढे म्हटले, "मी कोणाचे नाव घेतले नव्हते. मी फक्त टोपी फेकली होती; पण ती अनेकांच्या डोक्यावर जाऊन पडली. त्यामुळे अनेकांना ती लागली."
राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता आणखी एक उपरोधिक टिप्पणी केली.










