'अजितकाका.. तोपर्यंत मी बटण असंच उघडं ठेवणार', रोहित पवार विधानसभेत ढसाढसा रडले अन्..
आमदार रोहित पवार यांना अजित पवारांच्या शोक प्रस्तावावर बोलताना विधानसभेत अश्रू अनावर झाले. पाहा रोहित पवार नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (23 फेब्रुवारी) सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक प्रस्ताव मांडण्यात आला. ज्यामध्ये सर्वच नेत्यांनी सभागृहात भाषण करत अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांना विधानसभेत भाषण करताना अजित पवारांच्या आठवणीने अक्षरश: रडू कोसळलं. पाहा यावेळी रोहित पवार नेमकं काय म्हणाले.
विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर
'मी आणि अजितदादा हे फार जवळचं नातं होतं. माझ्या जीवनात मला जिल्हा परिषदचे.. म्हणजे राजकारणातलं पहिलं तिकिट कोणी दिलं असेल तर ते अजितकाकांनी दिलं. आमदारकीचं तिकिट कोणी दिलं असेल तर ते माझ्या काकांनी मला तिथे दिलं. माझ्या परिवारामध्ये आमचे जे काका असतात ते पुतण्याचं लग्न ठरवतात. पवार साहेबांनी काकांचं ठरवलं. आणि माझ्या काकांनी माझं लग्न ठरवलं. ती गोष्ट मी कधी आयुष्यात विसरणार नाही.'
हे ही वाचा>> अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी दिली माहिती
'माझे होणारे सासरे त्यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी विचारलं होतं की, माझी मुलगी मी रोहितला देणार आहे तुमचं काय मत आहे? त्यावेळी त्यांनी एक सेकंद सुद्धा लावला नाही आणि म्हणाले की, होतकरू मुलगा आहे, कष्टाळू आणि व्हिजन घेऊ चालतो. लगेचच्या लगेच तिथे लग्न करून टाक आणि स्वत: आजारी असताना सुद्धा काका लग्नाला आले होते. तिथे त्या दिवशी त्यांच्या मुलाचंच लग्न आहे असं ते वावरत होते.'
हे ही वाचा>> 'VSR कंपनीला कोण वाचवतंय...', रोहित पवारांनी 'त्या' केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मागितला, मोदी-शाहांकडेही मोठी मागणी
'पक्ष जेव्हा वेगळा झाला तेव्हा दादांकडून साहेबांबद्दल काही गोष्टी बोलल्या गेल्या असतील किंवा आम्ही बोललो गेलो असू.. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा काका आणि आम्ही बारामती हॉस्पिटलला भेटलो होतो आम्ही तिथे सातत्याने चर्चा करत होतो. गेल्या काही महिन्यात दादांसोबत अगदी जवळून काम करण्याची संधी मिळाली होती.'










