Mumbai Adivasi Student Protest | पोलिसांनी ताब्यात घेतलं? नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Mumbai Adivasi Student Protest : नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या ‘उलगुलान’ मोर्चावरून वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी पोलिसांवर ताब्यात घेतल्याचा आणि गैरवर्तनाचा आरोप केला असून, आंदोलनाच्या परवानगीसह वसतिगृहांच्या सुविधांबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Adivasi Student Protest
Mumbai Adivasi Student Protest
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

Mumbai Adivasi Student Protest

point

पोलिसांनी ताब्यात घेतलं? नेमकं काय घडलं?

Mumbai Adivasi Student Protest : नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या ‘उलगुलान’ पायी मोर्चावरून मुंबईत वाद निर्माण झाला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील शिक्षण व्यवस्था, जेवण, पाणी, वीज, स्वच्छतागृह आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा यांसह विविध प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघाले होते. 28 सप्टेंबरला नाशिकहून मोर्चाला सुरुवात झाल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, परवानगी नाकारण्यात आल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर विद्यार्थी मुंबईतील काँग्रेसच्या टिळक भवनमध्ये थांबले. याच ठिकाणी पोलिसांच्या कारवाईवरून विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, पहाटेच्या सुमारास पोलीस टिळक भवनमध्ये आले. सुरुवातीला त्यांनी विद्यार्थ्यांचे फोटो काढले आणि त्यानंतर काही विद्यार्थिनींना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर तीन विद्यार्थिनींना ताब्यात घेतल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. महिला पोलीस उपस्थित होत्या, मात्र विद्यार्थ्यांना नेमकं कुठे घेऊन जात आहोत, याची माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप आहे. काही विद्यार्थ्यांनी पोलिसांकडून धक्काबुक्की आणि गैरवर्तन झाल्याचाही दावा केला आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी वाहनातून नेऊन अनेक तास फिरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री दोन वाजण्याच्या सुमारास काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना एका ठिकाणी न नेता भिवंडी आणि परिसरात वाहनातून फिरवण्यात आलं. काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, चक्कर आली आणि काही जण बेशुद्ध झाल्याचा दावा करण्यात आला. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी विनंती करूनही तातडीची मदत मिळाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. काही विद्यार्थ्यांना अखेर कल्याण बायपासजवळ सोडण्यात आलं आणि त्यानंतर सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेल्याचं सांगण्यात आलं.

या आंदोलनामागे विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि आश्रमशाळांच्या परिस्थितीचे मुद्दे मांडले आहेत. काही वसतिगृहांमध्ये पाणी, वीज, स्वच्छतागृह, गाद्या आणि पांघरुणांसारख्या मूलभूत सुविधांची कमतरता असल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पाणी बाहेरून आणावं लागतं, तर सेंट्रल किचनमधून येणारं जेवण वेळेत आणि चांगल्या दर्जाचं मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. चोपडा, शहादा, जळगाव, नंदुरबार आणि इतर ठिकाणच्या वसतिगृहांची अवस्था विद्यार्थ्यांनी सांगितली. काही ठिकाणी स्वच्छतागृहांची संख्या कमी असून, इमारतींची दुरवस्था आणि छत गळण्याच्या समस्याही असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. मुलींना त्यांच्या तक्रारी मांडल्यामुळे लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास मंत्री, सचिव आणि आयुक्तांबाबतही मागण्या मांडल्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.