'हे इतकं विषारी होत चाललंय..', साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावर राज ठाकरेंची पोस्ट

मुंबई तक

Raj Thackeray on IIT Bombay student Sahil Wakode suicide Case : आयआयटी बॉम्बेमध्ये अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 22 वर्षीय साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. साहिलच्या पालकांनी जातीभेदाचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

Raj Thackeray on IIT Bombay student Sahil Wakode suicide Case
Raj Thackeray on IIT Bombay student Sahil Wakode suicide Case
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'हे इतकं विषारी होत चाललंय..'

point

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावर राज ठाकरेंची पोस्ट

Raj Thackeray on IIT Bombay student Sahil Wakode suicide Case : आयआयटी बॉम्बेमध्ये (IIT Bombay) अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 22 वर्षीय साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने शुक्रवारी (दि.18) वसतिगृहातील आपल्या खोलीत आत्महत्या केली. परीक्षेदरम्यान प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मोबाईल आणि 'चॅटजीपीटी'चा (ChatGPT) वापर करताना तो सापडला होता; मात्र या प्रकरणी त्याला केवळ समज देण्यात आली होती, त्याचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची ग्वाही दिल्याचे आयआयटी प्रशासनाचे म्हणणे आहे. असे असले तरी, साहिलच्या पालकांनी मात्र प्रशासनावर जातीभेद आणि संस्थात्मक मानसिक छळाचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांची दखल घेत पोलिसांनी आता भारतीय न्याय संहिता आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत (SC/ST Act) संबंधितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कॉपीच्या ठपक्यापासून सुरू झालेले हे प्रकरण आता जातीभेदाच्या वळणावर पोहोचल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, याच संवेदनशील पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी 

आयआयटी मुंबईमध्ये साहिल वाकोडे या वीस वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. परीक्षेदरम्यान त्याने मोबाईल आणि चॅटजीपीटीचा वापर केल्याचा आरोप आयआयटी प्रशासनाने सुरुवातीला केला. हा आरोप तपास पूर्ण होण्याआधी जाहीर करणं अयोग्य होतं, हे मान्य करत प्रशासनाने नंतर माफीही मागितली. दुसरीकडे साहिलच्या कुटुंबीयांनी जातीय छळाचे आरोप केले आहेत. त्या आरोपांवर गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. प्राध्यापकांनीही आपली बाजू मांडली आहे. या सगळ्या प्रकरणात एक तरुण मुलगा आपल्यातून गेला, त्याला थेट आत्महत्येचा मार्गच का स्वीकारावासा वाटला यावर कोणीच बोलताना दिसत नाहीये.

एखादा विद्यार्थी परीक्षेत गैरप्रकार करत असेल, तर त्याला रोखणं आणि त्याच्यावर नियमानुसार कारवाई करणं हे प्राध्यापकांचं कर्तव्यच आहे. पण आरोप सिद्ध होण्याआधी मृत विद्यार्थ्याला गुन्हेगार ठरवणं योग्य नाही. त्याचप्रमाणे जातीय छळाचा आरोप झाला म्हणून चौकशी पूर्ण होण्याआधी प्राध्यापकांना दोषी ठरवणंही योग्य नाही. पण या सगळ्याचा कुठेच विचार होत नाही. कारण या विषयांत आता 'जात' हा मुद्दा पुढे आणून, एका वीस वर्षांच्या मुलाला एका प्रसंगानंतर आपल्या आयुष्याचे सगळे मार्ग संपले आहेत, असं का वाटलं असेल? यावर बोलायचं नाहीये. विचार करायचा नाहीये. 

मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये सांगितलं आहे की 2000 सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली आहे की आपल्या शेजारी शाळेत बसणारा विद्यार्थी कुठल्या जातीचा आहे हे सांगू लागलेत, वर्षानुवर्षे एकत्र डबा खाणारे ऑफिसमधले कर्मचारी जातीच्या नजरेतून एक दुसऱ्यांकडे पाहायला लागलेत. आणि हे इतकं विषारी होत चाललं आहे की हे आता आयआयटीपर्यंत पोहचलं आहे. पंडित नेहरूंनी आयआयटीचं वर्णन आधुनिक भारताची मंदिरं असं केलं होतं त्या आयआयटीत विद्यार्थ्यांची आत्महत्या झाली, एक सहकारी आपल्यातून गेला यापेक्षा हे सगळं जातीतून घडलं हा पैलू पुढे यावा, यासारखं दुर्दैव नाही.