धैर्यशील मोहितेंची विनंती.. रणजितसिंह मोहिते मैदानात, बंधू एकत्र येणार का?

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने रणजीतसिंह मोहिते पाटील पुन्हा सक्रिय झाले आहेत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भावाला निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची विनंती केली असून, त्यांनी ती मान्य केली आहे.

ADVERTISEMENT

ranjitsinh mohite patil
ranjitsinh mohite patil
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

धैर्यशील मोहितेंची विनंती..

point

रणजितसिंह मोहिते मैदानात, बंधू एकत्र येणार का?

Ranjitsinh Mohite Patil : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांचे बंधू आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची विनंती केली आहे. रणजीतसिंह यांनीही ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे मोहिते पाटील बंधू एकत्र आल्याने सोलापूरच्या राजकारणात या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : सुनेत्रा पवार राज्याच्या अर्थमंत्री होणार? राष्ट्रवादीची बैठक अन् फडणवीसांच्या भेटीगाठी; काय घडतंय?

रणजीतसिंह मोहिते पाटील गेल्या काही वर्षांपासून राजकारणात फारसे सक्रिय नसल्याचे चित्र होते. भाजपच्या विधान परिषदेतील त्यांची मुदत संपल्यानंतर ते पुढे कोणती भूमिका घेणार, याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. आता सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही आपल्या भावाने निवडणुकीच्या मैदानात उतरावे, अशी भूमिका मांडली आहे. दोन्ही बंधूंनी एकत्र सभा घेतली. या सभेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या इच्छेचा उल्लेख करत रणजीतसिंह यांना निवडणुकीत सहभागी होण्याची विनंती केली. त्यानंतर रणजीतसिंह यांनी ही विनंती स्वीकारली.

सोलापूर जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील घडी कायम राखण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाच्या दारात जाऊन भेटण्याचा आणि सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा आपला जिल्हा असून, पूर्वीच्या पिढ्यांनी तो जपला आहे. आता जिल्हा जपण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे आणि त्यात आपली अधिक जबाबदारी असल्याचेही रणजीतसिंह यांनी नमूद केले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही सहकारी संस्थेची निवडणूक आहे. त्यामुळे त्यात राजकीय पक्षांचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही निवडणूक राजकीय पातळीवर लढवली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.

या घडामोडींमुळे सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या गटाचे खासदार आहेत, तर रणजीतसिंह मोहिते पाटील हे भाजपशी संबंधित आहेत. त्यामुळे सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोघे एकत्र आल्याने या घडामोडीला महत्त्व आले आहे. जिल्ह्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर रणजीतसिंह कोणती भूमिका घेतात आणि या निवडणुकीसाठी कोणाची साथ मिळवतात, याकडे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपची भूमिका काय असेल, याबाबतही चर्चा सुरू आहे.