‘इतिहास पुसता येत नाही’ म्हणत सहर शेखची औरंगजेबावर पोस्ट; नेमकं काय लिहिलं?
Sahar Shaikh Aurangzeb Birthday Post Controversy : ठाण्यातील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखने औरंगजेबाच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टमधील उल्लेखांमुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
‘इतिहास पुसता येत नाही’ म्हणत सहर यांची औरंगजेबावर पोस्ट
नेमकं काय म्हणाल्या?
Sahar Shaikh Aurangzeb Birthday Post Controversy : ठाण्यातील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी मुघल सम्राट औरंगजेबाच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी औरंगजेबाचा उल्लेख पूर्ण श्रद्धा आणि शक्तीने मलिक उल हिंदवर राज्य करणारा सम्राट असा केला आहे. तसेच इतिहास कधीही पुसता येत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. यापूर्वी 'कैसा हराया' या विधानामुळे सहर शेख चर्चेत आल्या होत्या. आता औरंगजेबाविषयीच्या पोस्टमुळे त्या पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
"विरोधात कितीही चित्रपट तयार केले, तरी औरंगजेबाचं महत्त्व कमी होणार नाही"
सहर शेख यांनी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर मुघल इतिहास आणि त्या काळातील वास्तूंविषयी अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये त्यांनी सिंह आणि औरंगजेबाचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. औरंगजेबाची प्रतिमा कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्या विरोधात कितीही चित्रपट तयार केले, तरी त्याचं महत्त्व कमी होणार नाही, असा दावा त्यांनी या पोस्टमधून केला आहे. याशिवाय त्यांनी मुघलकालीन स्थापत्यकलेचाही उल्लेख केला आहे. हुमायूँच्या कबरीबाहेरचा फोटो शेअर करताना त्यांनी, 'माझ्या मागे हुमायूँची कबर आहे. अशी कबर बांधली जात असेल तर देश कसा चालवला जात असेल, याचा कधी विचार केला आहे का?' असा सवाल उपस्थित केला आहे. या माध्यमातून त्यांनी मुघलकालीन वास्तूंचा उल्लेख केला आहे.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये सहर शेख यांनी ताजमहालचा फोटो शेअर केला आहे. मुघलांनी बांधलेल्या या वास्तूचा जगातील सात आश्चर्यांमध्ये समावेश असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. तसेच मुघलांना इतिहासाच्या पुस्तकातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 'पुस्तकातून मुघलांना बाहेर काढू शकता, पण या जमिनीवरून कसं बाहेर काढाल?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पोस्टच्या शेवटी त्यांनी 'इंशाल्लाह, मुगलिया सल्तनत का इकबाल हमेशा बुलंद रहे', असं लिहिलं आहे. या सर्व पोस्टमधून त्यांनी मुघल इतिहास आणि औरंगजेबाविषयीची भूमिका मांडली आहे.
दरम्यान, सहर शेख यांच्या या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. औरंगजेबाच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणाऱ्या पोस्टमध्ये केलेल्या उल्लेखांवरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. यामुळे औरंगजेबाच्या ऐतिहासिक वारशावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 'कैसे हराया' या विधानामुळे चर्चेत आलेल्या सहर शेख यांच्या नव्या पोस्टमुळेही राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. या पोस्टवर सहर शेख यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यांची याबाबतची भूमिका समोर आल्यास तीही महत्त्वाची ठरणार आहे.
