Sanjay Raut Interview : तृणमूल काँग्रेसच्या फुटीमुळे प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याला पुन्हा धोका?

मुंबई तक

Sanjay Raut Interview : उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यानंतर आता ममता बॅनर्जींसमोरही राजकीय आव्हानं उभी राहिली आहेत. महाराष्ट्रापासून पश्चिम बंगालपर्यंत प्रादेशिक पक्षांच्या राजकारणात होत असलेल्या बदलांचा अर्थ काय?

ADVERTISEMENT

Sanjay Raut Interview
Sanjay Raut Interview
Google CTA

बातम्या हायलाइट

point

तृणमूल काँग्रेसच्या फुटीमुळे प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याला पुन्हा धोका?

point

संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut Interview : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ आता तृणमूल काँग्रेससारख्या प्रादेशिक पक्षांना लक्ष्य केले जात असून, मूळ संस्थापकांकडून त्यांचे पक्ष आणि चिन्हे हिरावून घेण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने नुकतेच तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत जे पाऊल उचलले, ते शिवसेनेच्या बाबतीत घडलेल्या घटनाक्रमासारखेच अपेक्षित होते, असे राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्यांनी रक्त आटवून उभे केलेले पक्ष एका रात्रीत फुटीर गटांच्या हाती सोपवण्याचा हा नवा पायंडा लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.

वन नेशन, वन पार्टी हा अजेंडा

देशात केवळ एकच पक्ष असावा या भाजपच्या 'वन नेशन, वन पार्टी' अजेंड्याखाली प्रादेशिक पक्ष जाणीवपूर्वक संपवण्याचे काम सुरू असल्याचा दावा राऊत यांनी केला. राज्यघटनेतील दहाव्या अनुसूचीचा (10th Schedule) मूळ उद्देश राजकीय पक्षांचे संरक्षण करणे हा असताना, सध्याच्या निवडणूक आयोगाकडून त्याची व्याख्या बदलून फुटीर गटांना कायदेशीर मान्यता दिली जात आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या या यंत्रणांचा वापर करून देशातील प्रादेशिक अस्मिता नष्ट केली जात आहे. महाराष्ट्र आणि बंगालनंतर आता दक्षिणेतील द्रमुक (DMK) किंवा अगदी मित्रपक्ष असलेल्या जेडीयू (JDU) सारख्या पक्षांनाही फोडण्याचे प्रयत्न भाजपकडून भविष्यात होऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा : चक्राकार वाऱ्यांमुळे मुसळधार पाऊस, जोर वाढणार; कुठे-कुठे येलो अलर्ट?

प्रादेशिक पक्षांचे महत्त्व

पक्षचिन्हाच्या महत्त्वाबद्दल बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, प्रदीर्घ काळ एका चिन्हासोबत लढल्याने जनतेशी एक भावनिक जोड निर्माण झालेली असते. चोरांना घरमालक ठरवून मूळ पक्ष आणि चिन्ह काढून घेण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय अन्यायकारक होता, मात्र 'मशाल' हे नवे चिन्ह घेऊनही पक्षाने यश मिळवून दाखवले. राष्ट्रीय पक्ष हे प्रादेशिक प्रश्नांवर कधीही ठाम भूमिका घेऊ शकत नाहीत; उदाहरणार्थ बेळगाव सीमाप्रश्नावर भाजपसारखा राष्ट्रीय पक्ष सोयीस्कर मौन बाळगतो. अशा वेळी राज्याची भाषा, संस्कृती आणि प्रादेशिक अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी शिवसेना, द्रमुक किंवा तृणमूल काँग्रेससारख्या प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व अबाधित राहणे अत्यंत गरजेचे असते.

हे ही वाचा : अमोल खुणे Vs गंगाधर काळकुटे : मनोज जरांगेंवरील कोट्यवधी रुपयांच्या टेंडरच्या आरोपांवर काय म्हणाले?

प्रादेशिक पक्षांना संपवणे अशक्य

भाजप कितीही हुकूमशाही पद्धतीने वागत असला तरी प्रादेशिक पक्षांना कायमचे संपवणे त्यांना कधीही शक्य होणार नाही, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. सध्याचे मोदी सरकार स्वतःच्या बहुमतावर नसून चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांच्या कुबड्यांवरच टिकून आहे, याची आठवण त्यांनी करून दिली. प्रादेशिक पक्ष हे आकाशातून पडलेले नसून ते जनतेच्या मोठ्या संघर्षातून आणि बलिदानातून उभे राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी सत्तेच्या गर्वात राहू नये; कारण देशातील प्रादेशिक अस्मितेची ठिणगी विझवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ती नव्याने पेटतच राहील, असा इशारा राऊत यांनी दिला.