'... नाही तर धनुष्यबाण गोठवा!', ठाकरेंच्या वकिलांची आतापर्यंतची सर्वात मोठी मागणी.. शिंदेंना बसणार झटका?
शिवसेना नाव ठाकरे गटाचेच असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला. धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देता येत नसेल तर ते गोठवावे, अशी महत्त्वाची मागणीही त्यांनी केली.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईतील अंतिम सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर आपला युक्तिवाद मांडताना शिवसेनेचे मूळ नाव ठाकरे गटाचेच असल्याचा ठाम दावा केला. तसेच ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह शिंदे गटाला देऊ नये, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.
सिब्बल यांनी युक्तिवादाच्या समारोपावेळी न्यायालयासमोर आपली भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडली. “शिवसेना हे नाव ठाकरे यांचे आहे आणि शिंदे गटाला पक्षाचे चिन्ह देता कामा नये,” असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यांच्या मते, शिंदे गटाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा लाभ घेतला असला, तरी त्या लाभाच्या आधारावर त्यांच्याकडे कोणताही न्याय्य किंवा कायदेशीर हक्क निर्माण होत नाही.
‘लाभ घेतला म्हणून कायदेशीर हक्क निर्माण होत नाही’
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील महत्त्वाचा मुद्दा ‘Equity’ म्हणजेच न्याय्य हक्काशी संबंधित आहे. शिंदे गटाने ज्या चिन्हाचा वापर केला आणि त्याचा राजकीय फायदा घेतला, त्या वापरामुळे त्यांच्या बाजूने कोणताही न्याय्य हक्क निर्माण होऊ शकत नाही, असा दावा सिब्बल यांनी केला.
हे ही वाचा>> शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुप्रीम कोर्टात घमासान, कपिल सिब्बलांचा युक्तीवाद
त्यांच्या मते, एखाद्या चिन्हाचा लाभ घेतल्यामुळे त्या चिन्हावर मालकी किंवा कायदेशीर हक्क आपोआप निर्माण होत नाही. उलट, जर संबंधित पक्षाला सुरुवातीपासूनच त्या चिन्हाचा लाभ घेण्याचा अधिकार नव्हता, तर नंतर त्याच लाभाच्या आधारावर त्या पक्षाला ‘Equity’ मागता येणार नाही.
