संजय राऊत प्रादेशिक पक्षांचा उल्लेख करत राहुल गांधींची सत्ता येणार नाही, असं का बोलले?
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांनंतर आता तृणमूल काँग्रेस सारख्या इतर राज्यांतील बलाढ्य प्रादेशिक पक्षांना लक्ष्य केले जात असल्याचा एक अत्यंत खळबळजनक आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई Tak च्या मुलाखतीत केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मोदी सरकार प्रादेशिक पक्षांच्या कुबड्यांवर'
'राष्ट्रीय नेत्यांनी अहंकार बाळगू नये'
संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांनंतर आता देशातील इतर राज्यांतील बलाढ्य प्रादेशिक पक्षांना लक्ष्य केले जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 'मुंबई तक'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी हे गंभीर आरोप केले. मूळ संस्थापकांकडून त्यांचे हक्काचे पक्ष आणि अधिकृत चिन्हे हिरावून घेण्याचे एक मोठे राष्ट्रीय षड्यंत्र सध्या देशात सुरू आहे, असे राऊत म्हणाले. प्रादेशिक पक्षांचे भवितव्य धोक्यात असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी देशाच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, यावर सविस्तर भाष्य केले.
प्रादेशिक पक्षांच्या कुबड्यांवरच...
देशातील प्रादेशिक पक्षांना संपवणे कोणालाही शक्य नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे जागतिक कीर्तीचे मोठे नेते असले तरी, सध्या त्यांचे सरकार केवळ प्रादेशिक पक्षांच्या कुबड्यांवरच टिकून आहे. चंद्राबाबू नायडूंचा पक्ष, नितीश कुमार यांचा जनता दल तसेच महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट यांसारख्या प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यावरच एनडीए उभी असून मोदी पंतप्रधानपदी विराजमान आहेत. प्रादेशिक अस्मितेची ठिणगी सतत विझवण्याचा प्रयत्न झाला तरी ती नव्याने पेटतच राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जर सत्ताधाऱ्यांसोबत हे प्रादेशिक पक्ष नसते, तर काँग्रेस आणि विरोधी आघाडी नक्कीच बहुमतापर्यंत पोहोचली असती, असा दावाही राऊत यांनी केला.
हे ही वाचा : "दारावरची टकटक..", केंद्र सरकारच्या UPI निर्णयाबाबत राज ठाकरेंची सूचक पोस्ट
राहुल गांधी मोठे नेते, पण...
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांशिवाय आपला निभाव लागू शकत नाही, हे ध्यानात ठेवायला हवे, असा स्पष्ट संदेश राऊत यांनी दिला. राहुल गांधी हे फार मोठे नेते आहेत, मात्र जोपर्यंत ते स्वबळावर लोकसभेत 290 जागा निवडून आणत नाहीत, तोपर्यंत त्यांचे स्वतःचे एकहाती सरकार येऊ शकणार नाही. ज्या दिवशी काँग्रेस 150 जागा आणि देशातील सर्व प्रादेशिक पक्ष मिळून 150 जागा निवडून आणतील, तेव्हाच या देशात खऱ्या अर्थाने राजकीय परिवर्तन होईल. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल यांसारख्या पक्षांच्या मतांची टक्केवारी पाहिली तर प्रादेशिक पक्षांची खरी ताकद आणि त्यांचे देशाच्या राजकारणातील महत्त्व स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा : Sanjay Raut Interview : तृणमूल काँग्रेसच्या फुटीमुळे प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याला पुन्हा धोका?
राष्ट्रीय नेत्यांनी अहंकार बाळगू नये
देशाच्या राजकीय इतिहासाचा दाखला देत राऊत यांनी राष्ट्रीय नेत्यांना अहंकार न बाळगण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवले होते; राजीव गांधींनी तर तब्बल 400 जागा जिंकल्या होत्या. मात्र, पी. व्ही. नरसिंह राव यांना स्वबळावर तसे यश मिळवता आले नाही आणि त्यांचे सरकारही प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यावरच आले. तसेच, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यालाही सरकार चालवण्यासाठी 32 पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला होता, ज्यापैकी तब्बल 31 पक्ष हे प्रादेशिक होते. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी सत्तेच्या घमेंडीत राहू नये, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
