महाराष्ट्र-गुजरातच्या राड्यात सामंतांचा राजकीय डाव : ठाकरे गटाच्या निष्ठावंतालाच फोडलं

ठाकरे गटाकडील नगरपंचायतही शिंदे गटाच्या ताब्यात येणार?
uday Samant
uday Samant Mumbai Tak

मुंबई : महाराष्ट्रातील प्रस्तावित वेदांता-फॉक्सकॉन यांचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीचे नेते विरूद्ध शिंदे - फडणवीस सरकार असा सामना रंगला आहे. मागील 3 महिन्यांमध्ये काहीच प्रयत्न न झाल्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असा शिंदे सरकारवर होत असून याचा ठपका उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर ठेवण्यात येत आहे.

हा सर्व गोंधळ एका बाजूला सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला उदय सामंत यांनी कोकणात आपला राजकीय डाव खेळला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे. विलास साळसकर ठाकरे गटाचे निष्ठावंत मानले जात होते. मात्र मागील काही दिवसांपूर्वी नवीन तालुकाप्रमुखाची नियुक्ती केल्याने ते नाराज होते. त्यामुळेच त्यांनी शिंदे गटाची वाट धरली असल्याचे बोलले जात आहे. साळसकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

जानेवारी 2022 मध्ये झालेल्या देवगड-जामसांडे नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची सत्ता आणण्यात साळसकर यांचा मोठा वाटा होता. भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात संघर्ष करुन गेल्या निवडणुकीत एकही उमेदवार नसलेल्या देवगड नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने 8 जागांवर विजय मिळवला. पुढे राष्ट्रवादीशी युती करुन नगरपंचायतीवर सत्ता देखील स्थापन केली. आता विलास साळसकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने काटावर बहुमत असलेली देवगड नगरपंचायत भाजप-शिंदे गटाकडे जाण्यची शक्यता आहे. इथे भाजपचे 8 नगरसेवक आहेत.

दरम्यान, स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार ठाकरे गटाची साथ सोडताना साळसकर यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार देवगड तालुक्यातून 230 प्रतिज्ञापत्र पाठवली. पक्षासाठी निष्ठेने काम करून देखील 6 ऑगस्ट रोजी माझ्या जागेवर दुसरा तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील माझ्यावर अन्याय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

विकास कामे होण्यासाठी मी भांडत असताना मला कानफाटके म्हणत माझ्यावर विविध आरोप करण्यात आले. मात्र हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत. 2007 पासून मी नारायण राणे यांच्या विरोधात देवगडमध्ये ठाम राहिलो. या काळात कोणीही पदाधिकारी शिवसेना सोडून गेलेला नाही. असे असताना देखील मला पक्षीय ताकद देण्याऐवजी माझे खच्चीकरण करण्याचं काम वरिष्ठ पातळीवर केल्याचा आरोपही साळसकर यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in