Uddhav Thackeray : अदाणींना विरोध… ठाकरे काँग्रेससोबत, पण राजकारण काय?
मुंबई अदाणींच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. पण, या मागील राजकीय समीकरणं काय आहेत? तेच जाणून घ्या.
ADVERTISEMENT

Dharavi Redevelopment Project : शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरेंनी शिंदे सरकार आणि अदाणींवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या १६ डिसेंबरला अदाणींच्या कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. अदानींच्या प्रकरणात आक्रमक असलेल्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे देखील एकत्र आल्याचे दिसत आहेत. उद्धव ठाकरे अदानींच्या विरोधात भूमिका का घेतायेत? त्याच्यामागे राजकारण नेमकं काय आहे हेच आपण समजावून घेऊयात…
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत अदाणींवर तोफ डागली. त्याचबरोबर धारावीचा विकास करताना तेथील रहिवाशांना तेथेच घरं द्यावी, अशी मागणीही केली. त्याचबरोबर अदाणींना देण्यात येणाऱ्या टीडीआरचा सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी देखील ठाकरेंनी केली. मुंबई तुम्ही एकाच्या घशात घालायला निघाला आहात, असेही ठाकरे म्हणाले.
काँग्रेस उचलला मुद्दा, ठाकरेंही आक्रमक
अदाणींच्या कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सर्व मुंबईकरांनी सहभागी व्हावं, असं आवाहन देखील ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत केलं. धारावीचा पुनर्विकास करण्याचं काम सरकारकडून अदाणींना देण्यात आलं आहे. या बदल्यात सरकार मुंबईत इतर ठिकाणी अदाणींना टीडीआर देखील देणार आहे. अदाणींना देण्यात येणारा टीडीआर हा महाघोटाळा आहे, असा आरोप सातत्याने काँग्रेसच्या धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड करत आहेत. हे टीडीआर देणं म्हणजे मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटचा एकहाती ताबा हा अदाणींना देणं आहे, असा आरोप वर्षा गायकवाड सातत्याने करताहेत.
२६ नोव्हेंबरला वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मोर्चा देखील काढण्यात आला होता. त्यापूर्वी वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी उद्धव ठाकरेंचे धारावीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते.