S Y Quraishi : ‘दोन गोष्टींवरून निवडणूक आयोग ठरवणार शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची?’

मुंबई तक

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह पक्षाविरोधात बंड केलं. बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे समर्थक आमदारांच्या गटाने आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केली. पण आता लढाई सुरूये शिवसेना कुणाची? S Y Quraishi यांनी याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. आमदार आणि खासदार आपल्या बाजूने असल्याचं सांगत एकनाथ शिंदे आपणच खरी शिवसेना असल्याचं सांगत आहेत, दुसरीकडे पक्षाच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह पक्षाविरोधात बंड केलं. बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे समर्थक आमदारांच्या गटाने आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केली. पण आता लढाई सुरूये शिवसेना कुणाची? S Y Quraishi यांनी याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

आमदार आणि खासदार आपल्या बाजूने असल्याचं सांगत एकनाथ शिंदे आपणच खरी शिवसेना असल्याचं सांगत आहेत, दुसरीकडे पक्षाच्या घटनेचा हवाला देत शिवसेना उद्धव ठाकरेंचीच असल्याचं दावा केला जातोय. हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. याच तिढ्यावर निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय.

माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत निवडणूक आयोग कशाच्या आधारे निकाल देईल याबद्दल सांगितलं आहे.

पक्षात दोन गट पडल्यानंतर निवडणूक आयोग कोणत्या मापदंडांवर मुख्य पक्ष ठरवतो? या मुद्द्यावर बोलताना कुरेशी म्हणाले, “पक्षातील गटबाजीनंतर निवडणूक आयोग दोन्ही बाजूंच्या दाव्यांची तपासणी करून दोन बाबींवर निर्णय घेतो. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्या गटाकडे आमदार आणि खासदारांचे बहुमत आहे. दुसरी गोष्ट, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत कोणाच्या बाजूने बहुमत आहे. दोन्ही पक्षांचे दावे या दोन तराजूवर तोलले जातात. पक्ष रचनेत आमदार-खासदारांसह कोणत्या गटाला बहुमत आहे हेही आयोग पाहतो. निवडणूक आयोग दोन्ही पक्षांच्या दाव्यांना बहुमताचे तत्त्व लागू करून ‘मुख्य पक्ष’ म्हणून गट घोषित करण्याचा निर्णय घेतो,” असं ते म्हणाले.

निवडणूक आयोग कोणत्या नियमांनुसार निर्णय घेतो? याविषयी कुरेशी म्हणाले, “निवडणूक आयोग हा निर्णय ‘चिन्ह आदेश 1968’ अंतर्गत घेतो. यातील कलम 15 अंतर्गत, निवडणूक आयोग पक्षाचे चिन्ह आणि नाव केवळ आयोगाच्या समाधानाच्या आधारावर ठरवतो. विविध गटांतील स्थिती, पदाधिकाऱ्यांचे संख्याबळ, आमदार-खासदारांच्या आकड्यांवरून हे ठरविले जाते. निवडणूक आयोगाचा निर्णय सर्व वर्ग आणि गटांना बंधनकारक आहे, म्हणजेच सर्व घटकांना हा निर्णय मान्य करावा लागेल,” असं ते म्हणाले.

लोकसभा सचिवालयाची भूमिका वादात; शिवसेना पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

शिवसेनेच्या वादावर निवडणूक आयोग आता काय करणार?

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला प्रमुख पक्ष घोषित केले तर उद्धव गट काय करणार? या शक्यतेबद्दल बोलताना कुरेशी म्हणाले, “उद्धव गट अल्पमतात राहिल्यास त्यांना नवीन पक्ष म्हणून नोंदणी करावी लागेल. उद्धव गटाचे आमदार आणि खासदार नव्या पक्षाचे सदस्य मानले जातील. निवडणूक आयोगासाठी ही आव्हानात्मक परिस्थिती आहे. या स्थितीत निवडणूक आयोगाचे काम किचकट झाले आहे. मात्र दोन्ही गटातील बहुमताचा आकडा जाणून घेण्याचा निवडणूक आयोग प्रयत्न करेल.”

दाव्यांची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोग काय करेल, याबद्दलही कुरेश यांनी माहिती दिली. “निवडणूक आयोग पक्षाचे रेकॉर्ड आणि दोन्ही गटांच्या दाव्यांची तपासणी करेल. म्हणजेच, दोन्ही गट त्यांच्या दाव्यांच्या समर्थनार्थ नेत्यांच्या स्वाक्षरी केलेल्या याद्या देतील. निवडणूक आयोग दोघांचे दावे सिद्ध करण्यास सांगू शकतो,” असं कुरेशी म्हणाले.

शिवसेनेतल्या बंडामुळे सत्ता उद्धव ठाकरेंची गेली… मात्र सुप्रिया सुळेंचं टेन्शन का वाढलं?

पक्षाचे नाव, चिन्ह, मालमत्ता आणि निधीची विभागणी करण्याबद्दल बोलताना कुरेशी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला. “सर्वोच्च न्यायालयाचा यासंदर्भात एक आदेश आहे. साधारणपणे, कौटुंबिक मालमत्तेच्या बाबतीत, न्यायालय विभाजनाचे आदेश देते. पण पक्षांच्या बाबतीत असे होत नाही. निवडणूक आयोग कोणत्या गटाला ‘मुख्य पक्ष’ म्हणून घोषित करेल, त्या पक्षाचे नाव, चिन्ह आणि संपत्ती सर्व त्याच्याकडे जाईल.”

निवडणूक आयोग शिवसेनेचं चिन्ह गोठवेल?

या वादामुळे आयोगाकडून शिवसेनेचं चिन्ह गोठवलं जाईल, असंही बोललं जातंय. त्यावर कुरेशी म्हणाले, “काही दिवसांत निवडणुका होणार असतील, तर अशा स्थितीत निवडणूक आयोग प्रमुख पक्षाचे चिन्ह गोठवतो. यानंतर दोन्ही गटांना निवडणूक लढवण्यासाठी पक्षाची नवीन चिन्हे देण्यात येतात. पण महाराष्ट्रात २-३ वर्षे निवडणुका होणार नाहीत. अशा स्थितीत पक्षाचे चिन्ह गोठवण्याची गरज नाही. कोणत्या गटाला बहुमत आहे हे निवडणूक आयोगाने ठरवायचे आहे.”

उद्धव यांची पक्ष रचनेवरची पकड कायम राहिली आणि शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये फूट पडली नाही, तर काय चित्र असेल, याबद्दल कुरेशी म्हणाले, “अशा परिस्थितीत निवडणूक आयोगासाठी स्थिती गुंतागुंतीची ठरेल. साधारणत: बहुसंख्य खासदार आणि आमदार हे जास्त महत्त्वाचे मानले जातात. पण पक्षाची रचना खूप मोठी असेल आणि ती पूर्णपणे दुसऱ्या गटाच्या विरोधात असेल तर ती वेगळी परिस्थिती आहे. मात्र आमदार-खासदारांचे बहुमत महत्त्वाचे ठरणार आहे,” असं कुरेशी यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कुणाचं पारडं जड?

आताच्या स्थिती एकनाथ शिंदे यांच्या बाजूने पक्षाचे जास्त आमदार आणि खासदार असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे पक्षातील नेते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने दिसत आहे. पक्षाच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे हेच अजूनही पक्षप्रमुख असून, ज्या दोन गोष्टींवरून निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो. त्यातील एकामध्ये उद्धव ठाकरे, तर दुसऱ्या बाबीत एकनाथ शिंदे यांचं पारडं जड दिसत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp