Narayan Rane: "उद्धव ठाकरेंचं राजकारण फक्त 'मातोश्री' पुरतं, उरलेले आमदार लवकरच.."

वाचा सविस्तर बातमी काय म्हणाले नारायण राणे?
Narayan Rane Criticized Uddhav Thackeray
Narayan Rane Criticized Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे यांचं राजकारण फक्त मातोश्रीपुरतंच मर्यादित राहिलं आहे अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या १० लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला नारायण राणेही उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसंच आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं.

नारायण राणे काय म्हणाले?

तरूण-तरूणींना शासनाच्या विविध विभागात नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ हजार तरूणांना नोकऱ्या देऊन चांगलं काम केलं आहे. ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत त्यांना आनंद झाला आहे. त्यावरून कुणी राजकारण करत असेल तर मी त्यावर काही बोलणार नाही असं नारायण राणे म्हणाले.

उद्धव ठाकरेंविषयी काय म्हणाले नारायण राणे?

उद्धव ठाकरेंचा गट आणि शिवसेना कुठे राहिली आहे? ५६ आमदारांमधले ५-६ आमदार शिवसेनेत राहिले आहेत. ते सुद्धा लवकर प्रवेश करतील. ठाकरे सोडून महाराष्ट्र आणि देशात बरंच काही आहे त्यांचं राजकारण मातोश्री पुरतंच चालतं. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात ते माझे सहकारी होते तेव्हा ते असे नव्हते. असाही टोला नारायण राणेंनी लगावला आहे.

नारायण राणेंनी पुण्यातही पत्रकारांशी संवाद साधला

नारायण राणे यांनी आज पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या विविध नेत्यांना लक्ष्य केलं. तसंच आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे या आपल्या दोन मुलांच्या भाषेवरून होत असलेल्या टीकेवरही भाष्य केलं. 'तुम्हाला भास्कर जाधव यांची भाषा आवडते, पण फक्त माझी मुलंच दिसतात का? माझ्या मुलांनी प्रत्युत्तर दिले तर ते दिसते, पण बाकीचे लोक काय बोलतात हे मीडियाला दिसत नाही का? माझ्या मुलांविषयी बोलायला मी इथे आलो नाही,' असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेतले काही आमदार आमच्या संपर्कात

शिवसेनेतील फुटीनंतर ५५ पैकी तब्बल ४० आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं, तर १५ आमदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले. मात्र या १५ पैकी बहुतांश आमदार एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाण्यास उत्सुक असून चार आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in