शिवसेना पक्ष प्रमुख होणार का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले...

एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आम्ही पुढे नेत आहोत म्हणत उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे
शिवसेना पक्ष प्रमुख होणार का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले...
Will you be the Shiv Sena party chief? Eknath Shinde gave the answer Do You know the Answer

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचा आजचा चौथा दिवस आहे. शिवसेना विरूद्ध एकनाथ शिंदे गट असा सामना रंगला आहे. आमच्याकडे आमदारांचं संख्याबळ आहे असं एकनाथ शिंदे गटाचं म्हणणं आहे. तसंच आणखीही काही आमदार आमच्यासोबत येतील. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंची शिवसेना आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

अशात आता चर्चा या सुरू झाल्या आहेत की, शिवसेनेच्या धनुष्य बाण या पक्षचिन्हावरही एकनाथ शिंदे दावा सांगणार आहेत. शिवसेनेचं पक्षप्रमुख पदही ते काबीज करतील. मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांच्याशी फोनवरून संवाद साधत असताना एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. या दोघांमध्ये काय संवाद झाला आपण जाणून घेणार आहोत.

मुंबई तकचे संपादक साहिल जोशी आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून झालेला संवाद

साहिल जोशी: एकनाथजी, तुम्ही आता पक्षाच्या चिन्हावर दावा करून शिवसेना पक्ष प्रमुखही होणार आहात का?

एकनाथ शिंदे : हे पाहा आत्तापर्यंत आम्ही असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही कालही बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक होतो आणि आजही बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत.

साहिल जोशी : हो हे मान्य आहे पण पक्ष तर कुणाला तरी चालवावा लागेलच ना?

एकनाथ शिंदे : हो बरोबर आहे, पण आमची एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत जो सर्वानुमते चर्चेने निर्णय होईल त्यात काय निर्णय होतो त्यानंतर तो तुम्हाला कळवू.

साहिल जोशी : तुम्ही मुंबईत कधी परतणार?

एकनाथ शिंदे : लवकरच तुम्हाला त्याबद्दलही माहिती देऊ.

कुठलेच निर्णय मी एकटा घेत नाही. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख होणार का? या प्रश्नाला थेट नाही म्हटलेलं नाही. त्यामुळे चिन्हासाठी आमदारांचा हा गट कायदेशीर लढाई करायला गेला तर एकनाथ शिंदे यांना पक्ष प्रमुख होण्याची महत्त्वाकांक्षाही आहे हे लपून राहणार नाही.

शिवसेनेत झालेलं हे सर्वात मोठं बंड आहे. मात्र आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्हवरून संवाद साधत त्यांनी शिवसैनिकांना भावनिक केलं. शिवसेनेचा ५६ वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेनेचं राजकारण हे कायमच भावनेशी निगडीत राहिलं आहे.

शिवसेनेतून आत्तापर्यंत छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. मात्र एकनाथ शिंदे यांचं बंड हे या सगळ्यांपेक्षा सर्वात मोठं बंड ठरलं आहे. तसंच आता जर एकनाथ शिंदे यांनी पक्ष चिन्हावर म्हणजेच धनुष्य-बाणावर दावा सांगितला तर एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्ष प्रमुख होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत हे उघड आहे. तसं घडलं तर हा सर्वात मोठा फटका शिवसेनेला बसणार आहे यात काही शंका नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in