ICC ची मोठी कारवाई, भारत-पाकिस्तान संघाला फटका, टीम इंडियाला का बसला सर्वाधिक दंड?

आशिया चषक 2022 मध्ये, 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते.
ICC ची मोठी कारवाई, भारत-पाकिस्तान संघाला फटका, टीम इंडियाला का बसला सर्वाधिक दंड?

आशिया चषक 2022 मध्ये, 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. तेव्हा चाहत्यांनी या सामन्याची चांगलीच मजा लुटली. कारण हा सामना अतिशय रोमहर्षक झाला, सामन्याचा निकाल शेवटच्या षटकापर्यंत लागलेला नव्हता. मात्र या रोमांचक सामन्यात दोन्ही संघांना दंड ठोठावण्यात आला आहे.

आयसीसीने भारत आणि पाकिस्तान संघाला 40 टक्के दंड ठोठावला आहे, हा दंड स्लो ओव्हर रेटमुळे लावला गेला आहे. दोन्ही संघांना त्यांच्या क्षेत्ररक्षणाच्या वेळी षटक पूर्ण करण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला. हा दंड खेळाडूंच्या मॅच फीवर आधारित आहे, म्हणजेच भारतीय संघाला यात जास्त फटका बसला आहे. कारण भारतीय खेळाडूंची मॅच फी पाकिस्तानी खेळाडूंपेक्षा खूप जास्त आहे.

आयसीसीच्या निवेदनात काय आहे?

सामनाधिकारी जेफ क्रो यांच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्मा आणि बाबर आझम हे दोन्ही कर्णधार शेड्यूलच्या जवळपास दोन षटके मागे होते. आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, खेळाडू आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफच्या स्लो ओव्हर-रेटशी संबंधित ICC आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, निर्धारित वेळेत एक ओव्हर कमी केल्याबद्दल खेळाडूंना मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारला जातो.

आयसीसीचे म्हणणे आहे की, दोन्ही कर्णधारांनी त्यांची चूक मान्य केली असून त्यांनी दंडही स्वीकारला आहे, त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज नव्हती. मैदानावरील पंच मसूदूर रहमान आणि रुचिरा पिलियागुरुगे, तिसरे पंच रवींद्र विमलसिरी आणि चौथे पंच गाझी सोहेल यांनी दोन्ही संघांवर हे आरोप केले आहेत.

हार्दिक पांड्या ठरला होता हिरो

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर त्यात टीम इंडियाने पाच विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 147 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात भारताने शेवटच्या षटकात हे लक्ष्य गाठले. हार्दिक पांड्याने भारतासाठी सामना जिंकणारी खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने 17 चेंडूत 33 धावा केल्या आणि 3 विकेट्सही घेतल्या.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in