India vs Australia, WTC Test : भारताचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा भंगले!
सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) 2023 फायनलमध्ये धडक मारल्यानंतर भारतीयांच्या पदरी निराशा आली.
ADVERTISEMENT

India vs Australia WTC Test : सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) 2023 फायनलमध्ये धडक मारल्यानंतर भारतीयांच्या पदरी निराशा आली. ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर टीम इंडियाने नांग्या टाकल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला तब्बल 209 धावांनी पराभूत केले. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदाचे स्वप्न भंगले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 हंगाम दोन वर्षे चालला. यामध्ये चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल, तर भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अंतिम सामना झाला.
भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा WTC च्या अंतिम फेरीत पोहोचला होता. गेल्या वेळी साउथेम्प्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि विजेतेपदावर नाव कोरण्यात अपयश आले होते. पण, WTCच्या दुसऱ्या सत्रात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तेव्हा पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्याच्या चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातच घेतली आघाडी
ऑस्ट्रेलिया विरुद्धचा हा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल येथे 7 ते 11 जून दरम्यान खेळवला गेला. इतिहासात पहिल्यांदाच जूनमध्ये येथे कसोटी सामना झाला. या सामन्यात नाणेफेक भारताच्या बाजूने राहिली. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.









