Ind vs NZ : टीम इंडियाचा न्यूझीलंडला व्हाईटवॉश, ७३ रन्सनी जिंकला अखेरचा टी-२० सामना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्याच टी-२० मालिकेत घवघवीत यश मिळवलं आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७३ धावांनी मात करत पाहुण्या संघाला व्हाईटवॉश दिला आहे. १८५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १११ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताने ३-० च्या फरकाने ही मालिका जिंकत टी-२० विश्वचषकातलं अपयश धुवून काढलं आहे.

ADVERTISEMENT

अखेरच्या सामन्यासाठी भारताने संघात महत्वाचे बदल करुन इशान किशनला संधी दिली. रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी आश्वासक सुरुवात केली. रोहित शर्माने विशेषकरुन आक्रमक पवित्रा घेत न्यूझीलंडच्या बॉलर्सवर दबाव आणला. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ६९ रन्सची भागीदारी झाल्यानंत सँटनरने इशान किशनला आऊट केलं.

दरम्यानच्या काळात रोहितने आपलं अर्धशतक पूर्ण करत एक बाजू लावून धरली होती. सँटनरने सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत या दोन्ही फलंदाजांना झटपट गुंडाळून भारताला बॅकफूटवर ढकललं. यानंतर श्रेयस अय्यर आणि रोहितने पुन्हा एकदा छोटेखानी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. इश सोधीने रोहित शर्माला आपल्याच बॉलिंगवर कॅच घेत माघारी धाडलं.

हे वाचलं का?

रोहितने ३१ बॉलमध्ये ५ फोर आणि ३ सिक्स लगावत ५६ धावा केल्या. यानंतर अखेरच्या फळीत व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल आणि दीपक चहर यांनी अखेरच्या ओव्हर्समध्ये चौफेर फटकेबाजी करत संघाला १८४ धावांचा टप्पा गाठून दिला. न्यूझीलंडकडून सँटनरने ३ तर ट्रेंट बोल्ट, मिल्ने, फर्ग्युसन, इश सोध यांनी १-१ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात काहीशी अडखळती झाली. अक्षर पटेलने आपल्या एकाच ओव्हरमध्ये डॅरेल मिचेल आणि मार्क चॅम्पमन यांना माघारी धाडलं. पहिल्या दोन धक्क्यांमधून न्यूझीलंड सावरतय न सावरतय तोच अक्षर पटेलने ग्लेन फिलीप्सला क्लिन बोल्ड करत न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला. ३ बाद ३० यानंतर न्यूझीलंडचा संघ सावरु शकला नाही.

ADVERTISEMENT

टीम सेफर्ट आणि मार्टीन गप्टील यांनी छोटेखानी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. मार्टीन गप्टीलने यादरम्यानच्या ओव्हर्समध्ये भारतीय बॉलर्सवर चांगलाच हल्लाबोल करत चौफेर फटकेबाजी केली. युजवेंद्र चहलने मार्टीन गप्टीलला आपल्या जाळ्यात अडकवून भारताला आणखी एक यश मिळवून दिलं. गप्टीलने ३६ बॉलमध्ये ४ फोर आणि ४ सिक्स लगावत ५१ धावा केल्या. यानंतर न्यूझीलंडचा एकही फलंदाज मैदानावर तग धरु शकला नाही. लॉकी फर्ग्युसनने अखेरच्या ओव्हर्समध्ये काही सुरेख फटके खेळून संघाला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. परंतू न्यूझीलंडच्या अखेरच्या फळीची झुंज ही १११ धावांपर्यंत मर्यादीत राहिली. भारताकडून अक्षर पटेलने ३, हर्षल पटेलने २ तर दीपक चहर-युजवेंद्र चहल आणि व्यंकटेश अय्यरने १-१ विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT