RIP Shane Warne : क्रिकेटच्या ‘जयकांत शिक्रे’ची चटका लावणारी एक्झिट !
९० च्या दशकात जन्माला आलेल्या मुलांकडेना आठवणींचा खूप मोठा खजिना आहे. मग तो खजिना घरातल्या टीव्ही मालिकांपासून ते क्रिकेटच्या सामन्यांपर्यंत व्यापलेला आहे. या काळात जन्माला आलेल्या भारतीयांना क्रिकेटचं वेड लावलं ते सचिन तेंडुलकरने. अगदी पठडीबाज वाक्यांत सांगायचं झालं सचिन गळ्यातला ताईत होता आपल्या. तो आऊट झाला किंवा सचिनला आऊट करणाऱ्या बॉलरबद्दल मनात चीड यायची. सगळ्यात […]
ADVERTISEMENT
९० च्या दशकात जन्माला आलेल्या मुलांकडेना आठवणींचा खूप मोठा खजिना आहे. मग तो खजिना घरातल्या टीव्ही मालिकांपासून ते क्रिकेटच्या सामन्यांपर्यंत व्यापलेला आहे. या काळात जन्माला आलेल्या भारतीयांना क्रिकेटचं वेड लावलं ते सचिन तेंडुलकरने. अगदी पठडीबाज वाक्यांत सांगायचं झालं सचिन गळ्यातला ताईत होता आपल्या. तो आऊट झाला किंवा सचिनला आऊट करणाऱ्या बॉलरबद्दल मनात चीड यायची. सगळ्यात पहिल्यांदा ही चीड आणली ती ऑस्ट्रेलियाचा फिरकीचा जादूगार शेन वॉर्नने. आज वयाच्या ५२ व्या वर्षी शेन वॉर्नचं निधन झालं आणि काही क्षणांमध्ये जुन्या आठवणींचा सर्व पट डोळ्यासमोर येऊन गेला.
ADVERTISEMENT
एक साधारण उंची आणि अंगापिंडाने स्थुल असलेला एक स्पिनर असं काहीसं वर्णन शेन वॉर्नचं करता येईल. बॉलिंग करताना त्याचा रनअप असा काही नव्हतात…असं वाटायचं की बागेत फिरायला आलोय असा पवित्रा घेऊन शेन वॉर्न बॉल टाकायचा. पण बॉलचा टप्पा पडल्यानंतर हातभर वळून जेव्हा बॉल फलंदाजाची दांडी गुल करायचा तेव्हा सर्वचजण अवाक व्हायचे. माईक गॅटींगला शेन वॉर्नने मामा बनवून घेतलेली विकेट आजही अनेकांच्या स्मरणात आहे. आज शेन वॉर्न गेल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे शेन वॉर्न हा क्रिकेटच्या विश्वातला आणि अगदी नेमकं सांगायचं झालं तर सचिनसोबतच्या द्वंद्वातला जयकांत शिक्रे होता.
भारतीय लोकं आणि सचिनचं एक भावनिक नातं असायचं. सचिनला आऊट करणारा बॉलर पैदाच झाला नाही अशा चर्चा त्यावेळी शाळेतल्या आमच्यासारख्या मुलांमध्ये रंगायच्या. आता सचिनला कोणीच आऊट करु शकलं नाही पण त्याच्या साम्राज्याला आव्हान देणारा पहिला व्यक्ती ठरला तो म्हणजे शेन वॉर्न. आपल्या फिरकीच्या जोरावर शेन वॉर्नने अनेकदा सचिनला आपली शिकार केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लेग स्टम्पच्या बाहेर टप्पा पडून बॉल कधी आत शिरायचा आणि स्टम्पचा वेध घेऊन जायचा हे कोणालाच समजायचं नाही. विशेषकरुन सचिनची विकेट घेतल्यानंतर एका गुडघ्यावर बसून हाताची मुठ करुन शेन वॉर्नने दाखवलेली खुन्नस माझ्या पिढीला आजही लक्षात आहे. सचिनला आऊट करणारा बॉलर आहे ही बाब तेव्हा पचनी पडायची नाही. लेग स्पिन बॉलिंगमध्ये शेन वॉर्नने फार कमी कालावधीत आपला बेंचमार्क तयार केला.
हे वाचलं का?
कोणत्याही कथेतला नायक किंवा सुपरहिरो हा आपल्याला तेव्हाच मोठा वाटतो ज्यावेळी त्याचा प्रतिस्पर्धी हा तितकाच तगडा आणि तुल्यबळ असतो. आज शेन वॉर्न गेल्यानंतर या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होते आहे. कालांतराने सचिनने शेन वॉर्नची बॉलिंग डीकोड करायला सुरुवात केली. लेग स्पिन बॉलिंगवर पुढे येऊन केलेली फटकेबाजी आजही क्रिकेट फॅन्सच्या मनात कायम कोरली गेली आहे. यानंतर सचिन कायम शेन वॉर्नच्या एक पाऊल पुढे राहिला आहे. ९० च्या दशकातली अखेर आणि त्यानंतरच्या काही काळात सचिनने शेन वॉर्नची यथेच्छ धुलाई केली. ती पाहताना सचिन आणि क्रिकेटचा फॅन म्हणून खूप भारी वाटायचं.
पण आज एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे म्हणजे सचिनला मोठं करण्यात शेन वॉर्नसारख्या दिग्गजांचा मोठा वाटा आहे. काही क्षणांसाठी का होईना सचिनला किंवा जगातील कोणत्याही महान फलंदाजाला मी मामा बनवू शकतो हे शेन वॉर्नने दाखवून दिलं. आज त्याच्यामुळेच सचिन आम्हाला जास्त आवडत गेला आणि त्याच्यावरची आमची श्रद्धा अधिक अढळ होत गेली. आज त्या आठवणींच्या माळेतले काही मणी आज खाली पडले आहेत असं वाटतंय.
ADVERTISEMENT
दरम्यानच्या काळात शेन वॉर्नने मैदानात आपली महानता सिद्ध केली. मैदान कोणतंही असो हातभर बॉल वळवायचा शेन वॉर्नचा नित्यक्रम नेहमीचा ठरलेला असायचा. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचं नाव अनुभवाने आणि आदराने घेतलं जाऊ लागलं.
ADVERTISEMENT
दरम्यानच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्यावरुन त्याच्यात आणि मुरलीधरनमध्ये प्रत्येक सामन्यादरम्यान रंगलेली चढाओढ. आज वॉर्न पुढे तर उद्या मुरलीधरन पुढे. क्रिकेटमधली ही चढाओढ शेन वॉर्नने आमच्या पिढीला एन्जॉय करायला लावली. मैदानाबाहेरची त्याची कारकिर्द विवादास्पद राहिली असेलही पण क्रिकेटच्या मैदानावरचा एक महान खेळाडू आणि दिग्गजांना थेट नडणारा एक लेग स्पिनर ही छबी निर्माण करण्यात तो यशस्वी झाला. आयपीएलच्या पहिल्या वर्षात तुलनेने नवख्या राजस्थान संघाचं नेतृत्व करताना त्याने विजेतेपद मिळवून दिलं. अनेक भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात तो आघाडीवर असायचा. सुरुवातीला भारतीय क्रिकेट चाहत्यांचा कर्दनकाळ ते नंतर त्यांच्या आवडत्या खेळाडूंपैकी एक असा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे. जसं सिंघम चित्रपटात जयकांत शिक्रे पावला-पावलावर नायकाला आव्हान देत गेला, तसंच शेन वॉर्नने आपल्या कारकिर्दीत प्रत्येक महान खेळाडूला चॅलेंज केलं आणि त्यांना अडचणीत आणून दाखवलं. फरक इतकाच की चित्रपटातल्या जयकांत शिक्रेची अखेर ही चांगली वाटली असली तरीही क्रिकेटच्या मैदानातल्या जयकांत शिक्रेची अखेर खरंच चटका लावून जाणारी आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT