SC, ST समाजातील व्यक्ती RSS चा सरसंघचालक बनू शकतो का? मोहन भागवत यांचं सविस्तर भाष्य
Mohan Bhagwat on RSS Sarsanghchalak selection : संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत भविष्यातील दिशा, सामाजिक जबाबदाऱ्या आणि बदलत्या काळातील संघाची भूमिका यावर मोहन भागवत यांनी सविस्तर विचार मांडले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने या व्याख्यानासाठी उपस्थित होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
SC, ST समाजातील व्यक्ती RSS चा सरसंघचालक बनू शकतो का?
मोहन भागवत यांचं सविस्तर भाष्य
Mohan Bhagwat on RSS Sarsanghchalak selection, मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ‘संघाचा 100 वर्षांचा प्रवास – नवी क्षितिजे’ या विषयावर महत्त्वपूर्ण सत्र पार पडले. वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात आज (दि.8) सकाळी 10.30 वाजता झालेल्या या सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत भविष्यातील दिशा, सामाजिक जबाबदाऱ्या आणि बदलत्या काळातील संघाची भूमिका यावर त्यांनी सविस्तर विचार मांडले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने या व्याख्यानासाठी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मोहन भागवत यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी सविस्तरपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहे. त्यांना कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले? आणि त्यांनी कोणती उत्तरे दिली सविस्तर जाणून घेऊयात.....
समाजात RSS बाबत अनेक भ्रम आहेत. ते कसे दूर करता येतील? संघाचे स्वयंसेवक कोणत्याही परिस्थितीत कसे काम करतात? शाखेतील कामाच्या स्वरुपात वेळेनुसार बदल आणावेत असं वाटतं का? नव्या पिढीसाठी संघाच्या कामात इंग्रजी भाषेचा समावेश केला जावा का?
मोहन भागवत म्हणाले, परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकुल असतेच. परिस्थितीचा जास्त विचार करुन फायदा नाही. आपण उपाय काय आहेत? याचा विचार केला पाहिजे. स्वयंसेवक अशा पद्धतीने विचार करतो. इकडं असं झालं. तिकडं तसं झालं, समोर अडचणी आहेत, पुढे अडचणी आहेत, असा विचार करुन काहीच फायदा नाही. परिस्थिती कशी आहे? हे पाहून मी यामध्ये काय करु शकतो. याचा विचार करायला हवा. संघाचे स्वयंसेवक असाच विचार करतात. जिथे विरोध होता, तिथेही त्यांनी सुरुवात केली. हळूहळू काम उभं करता आलं. त्यांनी परिस्थितीचा विचार केला नाही. नवं काम असेल तर लोकांच्या मनात भ्रम असतात. भ्रम पसरवले देखील जातात. संघाबाबत असं अनेकदा घडलंय. परंतु हे भ्रम तोपर्यंत चालतात, जोपर्यंत सत्य समोर येत नाही. 'जोवरी जोवरी जंबूक करी गर्जना l जवं त्या पंचानना देखिले नाही' असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले होते. जोपर्यंत वाघ समोर येत नाही. तोपर्यंत ते ओरडत असतात. सत्य समोर आल्यानंतर भ्रम दूर होतात. आपलं काम संस्कारांचं आहे, प्रचाराचं नाही. त्यामुळे प्रचारच्या क्षेत्रात आम्ही मागे राहिलोय. प्रचार करताना प्रचार करणाऱ्यांवरही काही परिणाम होतात.. प्रचार केला तर प्रसिद्धी वाढते. प्रसिद्धी वाढली तर अहंकार वाढतो. सार्वजनिक जीवनात यापासून बचाव करणे आवश्यक असतं. प्रसिद्धी कमी झाली तरी खराब आहे, जास्त झाली तरी खराब आहे. प्रचार कार्याचा करावा, व्यक्तीचा नाही. ज्याठिकाणी जेवढं आवश्यक त्याठिकाणी तेवढा करावा. असं आपलं काम सुरु आहे, त्यामुळे आपण थोडे मागे आहोत. एका प्रतिष्ठित मासिकाचे संपादक आहेत. ते संघाचे कडवे विरोधक होते. मला भेटायला आले. मी त्यांना जे सर्वांना सांगतो तेच सांगितलं. तरी देखील त्यांचे अनेक प्रश्न कायम होते. मी त्यांना नागपूरच्या तृतीय वर्ष वर्गात दोन दिवस राहाण्यासाठी बोलवले. एक सोडला तर त्यांचे सगळे प्रश्न मिटले. तो प्रश्न अजूनही कायम आहे, सांगितल्यानंतरही विश्वास होत नाही. संघाकडे पैसा कुठून येतो? हा तो प्रश्न आहे. मी त्यांना सांगतो की, संघ चालवण्यासाठी स्वयंसेवक गुरुदक्षिणा देतात. सेवा देण्यासाठी समाजातून मदत घेतो. मात्र, त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांचा हा प्रश्न सोडला तरी बाकीच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली. संघात येऊन पाहा संघ कसा आहे? असं मी नेहमी आवाहन करतो. तुमचे प्रश्न कायम राहतील. मात्र, एक चमचा साखर खाल्ल्यानंतर साखर गोड आहे, हे सांगण्याची आवश्यकता राहात नाही.
पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले, इंग्रजी भाषा संघाच्या कामाची पद्धतीत कधीच येणार नाही. कारण ती भारतीय भाषा नाही. आपल्याला भारतीय लोकांमध्ये काम करायचं आहे. हिंदी मातृभाषा आहे, असं म्हणत आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो. मात्र, त्याने मातृभाषा बदलत नाही. परंतु जिथे इंग्रजी आवश्यक आहे, तिथं आम्ही त्याचा वापर करतो. भाषेशी आपलं भांडण नाही. आम्ही आहोत, तेच आम्हाला राहायचंय. इंग्रजी अशी बोलायला हवी की, इंग्लंडचे लोक तिकिट काढून आपलं भाषण ऐकायला यायला हवेत. अशी इंग्रजी आपल्याला यायला हवी. जिथे इंग्रजीशिवाय आपलं काम करता येणार नाही, तिथं आम्ही इंग्रजी बोलतो. मात्र, आम्ही संघाचं काम इंग्रजीत करणार नाहीत. संघात भारतीय भाषाच चालेल.










