तीन दिवसांपासून बंद असलेल्या दुकानात सापडला मृतदेह, 8 वर्षांपासून सोबत असलेला पार्टनर फरार
Crime News : गोरखपूरच्या कॅंट परिसरात ३ दिवसांपासून बंद असलेल्या एका दुकानात २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तीन दिवसांपासून बंद असलेल्या दुकानात सापडला मृतदेह
8 वर्षांपासून सोबत असलेला पार्टनर फरार
UP Crime News : उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, ३ दिवसांपासून बंद असलेल्या एका दुकानात एका २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून स्थानिक नागरिक दहशतीखाली आहेत. जिल्हा पंचायत रोडवरील महाराणा प्रताप बिल्डिंगमधील 'यश फ्लॅक्स' नावाच्या दुकानात हा मृतदेह आढळलाय. गेल्या काही दिवसांपासून हे दुकान बाहेरून बंद होते, परंतु तिथून येणाऱ्या उग्र दर्पामुळे परिसरातील दुकानदारांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दुकानाचा शटर उघडला असता, आतमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला. ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या कॅंट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
मयत तरुणीची ओळख आणि नातेवाईकांचा शोध
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मयत तरुणीची ओळख कुमारी गंगोत्री यादव म्हणून पटली असून ती मूळची महाराजगंज जिल्ह्यातील रहिवासी होती. गंगोत्री गोरखपूरमधील गोलघर परिसरात असलेल्या "यश फ्लॅक्स" नावाचे दुकान स्वतः चालवत असे. तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगोत्री गेल्या सुमारे ८ वर्षांपासून अनिल गुप्ता नावाच्या एका तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. गेल्या ३ दिवसांपासून तिचा मोबाईल फोन सतत बंद येत होता आणि तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकत नव्हता. वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होत नसल्यामुळे नातेवाईकांना काहीतरी अघटित घडल्याची भीती वाटली आणि त्यांनी महाराजगंजवरून थेट गोरखपूर गाठले. शोध घेत असताना त्यांना दुकानातून उग्र वास येत असल्याचे जाणवले, त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
संशयित जोडीदार फरार आणि पोलिसांचा तपास
या संपूर्ण प्रकरणाने तेव्हा अधिक गंभीर वळण घेतले जेव्हा गंगोत्रीचा जोडीदार अनिल गुप्ता हा बेपत्ता असल्याचे समोर आले. घटनेच्या दिवसापासून अनिल फरार असून त्याचा मोबाईल फोन देखील बंद आहे, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. स्थानिक दुकानदारांनी पोलिसांना सांगितले की, मागील ३ दिवसांपासून हे दुकान पूर्णपणे बंद होते आणि आतमध्ये काय सुरू आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. अनिलचा पत्ता लागत नसल्याने पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली असून त्याचे मोबाईल लोकेशन तपासले जात आहे. ३ दिवसांपासून दुकान बंद असणे आणि गंगोत्रीचा मृतदेह तिथे सापडणे, या सर्व बाबी संशयास्पद असून पोलीस या प्रकरणाचा हत्येच्या कोनातून तपास करत आहेत.









