'आईची अवस्था बघवत नाही..' आजारी आईला चौथ्या मजल्यावरुन खाली ढकलून संपवले; मुलगा काय म्हणाला?
एका 42 वर्षीय व्यक्तीने आपल्या आईची हत्या केली आहे. यामागे धक्कादायक कारण असल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसही हादरुन गेले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'आईची अवस्था बघवत नाही..'
आजारी आईची चौथ्या मजल्यावरुन खाली ढकलून केली हत्या
मुलगा काय म्हणाला?
Bangalore Crime : बेंगलोरमधील आरआर नगर भागात बुधवारी (15 एप्रिल) एक सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. एका 42 वर्षीय व्यक्तीने आपल्या 75 वर्षांच्या वृद्ध आणि अर्धांगवायूने ग्रस्त असलेल्या आईला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून तिची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
चौथ्या मजल्यावरुन ढकलून दिले
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा एका खासगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. तो आपल्या कुटुंबासह आणि वृद्ध आईसोबत एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहत होता. त्याची आई गेल्या 4-5 वर्षांपासून अर्धांगवायूने आजारी होती आणि पूर्णपणे अंथरुणाला खिळलेली होती. बुधवारी आरोपीने आपल्या आईला उचलून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवर नेले आणि तिथून तिला थेट ढकलून दिले. या भीषण घटनेत वृद्ध मातेचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा : समजून घ्या: डिलिमिटेशन म्हणजे काय? 'या' राज्यांना नेमकी भीती तरी कसली?
हत्येमागचे धक्कादायक कारण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक चौकशीनंतर मुलाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सांगितले की, आपल्या आईला दररोज यातना सहन करताना त्याला बघवत नव्हते. तसेच तिची सेवा आणि काळजी घेणे त्याला कठीण जात होते, याच हतबलतेतून आणि त्रासातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हे ही वाचा : अमरावती : परतवाडा स्कँडलप्रकरणी आरोपीचा खळबळजनक खुलासा, 'त्या' फ्लॅटमध्ये काय घडलं?
पोलीस तपास सुरु
आरआर नगर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या धक्कादायक कृत्यात आरोपीला कुटुंबातील इतर कोणाची मदत मिळाली होती का, किंवा यामागे आणखी काही कौटुंबिक वाद होते का, या दिशेनेही पोलीस सध्या तपास करत आहेत. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून, वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









