अमोल मुझुमदार मुंबई क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक
स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीमुळे नाव मोठं केलेल्या अमोल मुझुमदारच्या खांद्यांवर आता नवीन जबाबदारी आली आहे. ज्या मुंबई संघाचं अमोलने दीर्घ काळ प्रतिनीधीत्व केलं त्या मुंबई संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून अमोल मुझुमदारची निवड झाली आहे. रमेश पोवारच्या जागी अमोल मुझुमदार आता मुंबई संघाची सूत्र सांभाळेल. अमोल मुझुमदारसोबत ९ दिग्गज नावं मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी शर्यतीत होती. ज्यात वासिम […]
ADVERTISEMENT

स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीमुळे नाव मोठं केलेल्या अमोल मुझुमदारच्या खांद्यांवर आता नवीन जबाबदारी आली आहे. ज्या मुंबई संघाचं अमोलने दीर्घ काळ प्रतिनीधीत्व केलं त्या मुंबई संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून अमोल मुझुमदारची निवड झाली आहे. रमेश पोवारच्या जागी अमोल मुझुमदार आता मुंबई संघाची सूत्र सांभाळेल.
अमोल मुझुमदारसोबत ९ दिग्गज नावं मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी शर्यतीत होती. ज्यात वासिम जाफर, बलविंदर सिंग संधू, साईराज बहुतुले, सुलक्षण कुलकर्णी, प्रदीप सुंदरम, नंदन फडणीस, उमेश पटवाल, विनोद राघवन यांचा समावेश होता. परंतू प्रशिक्षक निवडीचे अधिकार असलेल्या MCA च्या Cricket Improvement Committee ने अमोल मुझुमदारला आपली पसंती दिली. जतीन परांजपे, निलेश कुलकर्णी आणि विनोद कांबळी या त्रिसदस्यीय समितीने अमोलच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
महत्वाची गोष्ट म्हणजे अमोल मुझुमदारने याआधीही मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. परंतू त्यावेळी रमेश पोवारचं पारड जड ठरलं होतं. रमेश पोवारच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या संघाने विजय हजारे करंडक जिंकला होता. अमोल मुझुमदारच्या नावावर स्थानिक क्रिकेटमध्ये ११ हजार १६७ धावा जमा असून तो १७१ प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. रणजी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अमोल काहीकाळ कॉमेंट्रीकडे वळला होता. मध्यंतरीच्या काळात अमोल मुझुमदारने NCA आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा बॅटींग कोच म्हणूनही काम पाहिलं. याव्यतिरीक्त दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात अमोलने आफ्रिकन संघाचा हंगामी कोच म्हणूनही काम केलं आहे. त्यामुळे अमोलच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचा संघ आगामी स्थानिक स्पर्धांमध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.