शंभरावी कसोटी आणि विराट-सचिनची तुलना, कोहली मोडू शकेल का तेंडुलकरचा रेकॉर्ड?
शंभर कसोटी सामने खेळणं हा कोणत्याही क्रिकेटपटूच्या कारकिर्दीतला महत्वाचा टप्पा मानला जातो. आजही क्रिकेटचे जुने आणि दर्दी चाहते आहेत त्यांच्यासाठी कसोटी क्रिकेट हाच खरा क्रिकेटचा फॉर्म आहे. पाच दिवस दोन्ही संघांमध्ये चालणारे डावपेच पाहणं ही एक वेगळीच मजा असते. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आपल्या कसोटी कारकिर्दीतला शंभरावा सामना मोहालीत श्रीलंकेविरुद्ध खेळतो आहे. आक्रमकता, […]
ADVERTISEMENT

शंभर कसोटी सामने खेळणं हा कोणत्याही क्रिकेटपटूच्या कारकिर्दीतला महत्वाचा टप्पा मानला जातो. आजही क्रिकेटचे जुने आणि दर्दी चाहते आहेत त्यांच्यासाठी कसोटी क्रिकेट हाच खरा क्रिकेटचा फॉर्म आहे. पाच दिवस दोन्ही संघांमध्ये चालणारे डावपेच पाहणं ही एक वेगळीच मजा असते. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आपल्या कसोटी कारकिर्दीतला शंभरावा सामना मोहालीत श्रीलंकेविरुद्ध खेळतो आहे. आक्रमकता, तंत्रशुद्ध शैली आणि फटक्यांमधली नजाकत हा विराटचा खेळाडू म्हणून सर्वात मोठा प्लस पॉईंट मानला जातो.
भारतीय संघाचं नेतृत्व आपल्या हाती आल्यानंतर विराटने संघासाठी आपलं सर्वतोपरीने योगदान दिलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताची छबी आक्रमक देश म्हणून तयार करण्यात सौरव गांगुलीनंतर विराट कोहलीचा मोठा वाटा आहे. विराटच्या खेळावर फिदा झालेल्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याची तुलना सचिन तेंडुलकरसोबत केली आहे. इतकच काय तर खुद्द सचिननेही एका कार्यक्रमात आपले रेकॉर्ड कोणी मोडू शकेल असं वाटतं का असा प्रश्न विचारला असता विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन खेळाडूंचं नाव घेतलं होतं.
भारताचा दुसरा सचिन तेंडुलकर बनण्याच्या वाटेवर असलेल्या विराटची घौडदौड गेल्या काही वर्षांपासून चांगली सुरु होती. परंतू प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात जसा बॅडपॅच येतो तसाच विराटच्या आयुष्यात आला. कर्णधारपदाची जबाबदारी, मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्याची हुकलेली संधी आणि त्यामुळे धावांचा आटलेला ओघ अशा दुष्टचक्रात विराट गेली काही वर्ष अडकला आहे. याचंचं एक उदाहरण म्हणून सांगायला गेलं तर २०१९ मध्ये विराटने घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात शतक झळकावलं होतं. यानंतर शतकी खेळी ही विराटवर अशी काही नाराज झाली आहे की अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये विराटला शतक झळकावता आलेलं नाही.
विराटसारख्या खेळाडूच्या करिअरमध्ये अशी वेळ का यावी असा प्रश्न अनेकांना पडला असेल? एक क्रिकेटचा चाहता म्हणून तो प्रश्न माझ्याही मनात आला होता. त्यामुळे या गोष्टीचा शांतपणे विचार करायला गेला तर एक कारण प्रामुख्याने समोर येतं ते म्हणजे, विराटच्या खांद्यावर आलेली कर्णधारपदाची जबाबदारी आणि कर्णधार म्हणून काम पाहताना महत्वाच्या स्पर्धांमध्ये आलेलं अपयश. जवळपास सात वर्षांचा कालावधी विराटने भारतीय संघाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व केलं. या काळात तो फलंदाजीही चांगली करत होता. परंतू २०१७ चॅम्पिअन्स ट्रॉफी दरम्यान झालेला वाद, २०१९ वर्ल्डकप मध्ये झालेली हाराकिरी एक कर्णधार आणि खेळाडू म्हणून विराटला चांगलीच महागात पडली आहे असं सारखं वाटत राहतं.