Bhaubeej 2025 : हिंदू धर्मानुसार दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि उत्साहाचा सण मानला जातो. या सणाचा शेवटचा आणि सर्वात आत्मीयतेचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी भावंडांमधील प्रेम, आपुलकी आणि नात्याची दृढता व्यक्त केली जाते. दरवर्षी हा सण कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीयेला साजरा केला जातो.
ADVERTISEMENT
भाऊबीज 2025 तारीख आणि मुहूर्त
यंदा भाऊबीज 23 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. द्वितीया तिथी रात्री 8 वाजून 16 मिनिटांनी सुरू होऊन रात्री 10 वाजून 46 मिनिटांनी समाप्त होईल. भाऊबीजेच्या पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 1 वाजून 13 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 28 मिनिटांपर्यंत राहील.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: मित्रासोबत बोलत असताना अचानक छातीत चाकू भोसकला अन्... CCTV मध्ये थरार घटना कैद
भाऊबीजेचे धार्मिक महत्त्व
भाऊबीज हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भाऊ आणि बहीण एकमेकांबद्दलचा स्नेह आणि आदर व्यक्त करतात. पुराणकथेनुसार, या दिवशी यम त्याची बहीण असलेल्या यमुनेकडे गेला होता. बहिणीच्या आदरातिथ्याने प्रसन्न होऊन यमाने वर दिला की या दिवशी जे बहीण भाऊ एकत्र येऊन पूजा करतील त्यांना मृत्यूनंतर यमलोकात जावे लागणार नाही. असेही म्हटले जाते की, भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून द्वारकेत परत आल्यावर त्याची बहीण सुभद्रा हिने फुलं, मिठाई आणि दिवे लावून त्याचे स्वागत केले. तिने कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतरपासून भाऊबीजेचा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.
पूजेची परंपरा आणि विधी
या दिवशी सकाळी बहीण स्नान करून कुलदैवत, भगवान विष्णू किंवा श्री गणेशाची पूजा करते. त्यानंतर ती भावाच्या हाताला कुंकू आणि तांदळाचा लेप लावते. त्यावर विड्याची पाने, सुपारी आणि चांदीचे नाणे ठेवून धांगा बांधते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. काही ठिकाणी बहीण भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याचे औक्षण करते आणि त्याला मिठाई भरवते. भाऊ आणि बहीण एकमेकांना भेटवस्तू देतात. औक्षणासाठीच्या ताटामध्ये कुंकू, फुले, अक्षता, सुपारी, विड्याची पाने, चांदीचे नाणे, नारळ, फुलांची माळ, मिठाई, धागा आणि केळी यांचा समावेश असतो. या वस्तूंशिवाय भाऊबीजेची पूजा अपूर्ण मानली जाते.
भाऊबीज हा केवळ सण नसून भावंडांच्या नात्यातील आपुलकी, प्रेम आणि विश्वासाचा उत्सव आहे. दिवाळीच्या अखेरीस हा दिवस प्रत्येक घरात आनंद, आशीर्वाद आणि सौहार्द यांचा प्रकाश पसरवतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ऐन दिवाळीत कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर भीषण अपघात, भाऊबीजेपूर्वी भावासह बहिणीचा चिरडून मृत्यू
ADVERTISEMENT
