SEBI on GMO, मुंबई: शेअर बाजारात एखाद्या कंपनीचा आयपीओ (IPO) येणार असल्याची बातमी आली की, अनेक गुंतवणूकदारांची पहिली नजर कंपनीच्या बिझनेस मॉडेलवर, आर्थिक स्थितीवर किंवा व्हॅल्युएशनवर जात नाही. त्याआधी एकच प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे या आयपीओचा जीएमपी (GMP) किती आहे? जीएमपी जास्त असेल तर लिस्टिंगच्या दिवशी बक्कळ नफा होणार आणि कमी असेल तर नुकसान, असं एक अलिखित समीकरणच बाजारात तयार झालं आहे. आता मात्र आयपीओ गुंतवणूकदारांच्या याच आवडत्या आकड्याला लगाम घालण्याचा प्रयत्न बाजार नियामक सेबीकडून (SEBI) केला जाणार आहे.
ADVERTISEMENT
सेबीने नुकत्याच जारी केलेल्या एका महत्त्वपूर्ण सूचनेद्वारे सर्व बाजार सहभागीदारांना आगामी आयपीओंचे 'जीएमपी' आकडे प्रसिद्ध करणं, दाखवणं किंवा प्रसारित करणं तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. वेबसाइट्स, डिजिटल प्लॅटफॉर्म, ई-मेल, एसएमएस आणि सोशल मीडिया अशा कोणत्याही माध्यमातून ही आकडेवारी शेअर करू नये, असं सेबीने स्पष्ट केलं आहे.
सेबीच्या मते, जीएमपीचे आकडे अनधिकृत असतात. त्यावर आधारित गुंतवणुकीचे निर्णय घेणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आता आयपीओ बाजारात केवळ जीएमपी पाहून निर्णय घेणाऱ्या गुंतवणूकदारांना कंपनीच्या आर्थिक स्थितीकडे आणि व्यवसायाकडे अधिक लक्ष द्यावं लागणार आहे.
'ग्रे मार्केट प्रीमियम' म्हणजे नेमकं काय?
कोणत्याही कंपनीचे समभाग (शेअर्स) अधिकृत शेअर बाजारावर सूचीबद्ध होण्यापूर्वीच एका अनधिकृत बाजारात त्यांची कथित खरेदी-विक्री सुरू होते, ज्याला 'ग्रे मार्केट' म्हणतात. आयपीओच्या मूळ किमतीपेक्षा (Issue Price) या अनधिकृत बाजारात शेअरवर जो अतिरिक्त दर सांगितला जातो, त्याला 'ग्रे मार्केट प्रीमियम' म्हणतात. उदाहरणार्थ, एखाद्या आयपीओची किंमत 1000 रुपये असेल आणि त्याचा जीएमपी 200 रुपये दाखवला जात असेल, तर तो शेअर 1200 रुपयांच्या आसपास लिस्ट होईल, असा अंदाज बांधला जातो. मात्र, हा केवळ अनधिकृत व्यवहारांवर आधारित अंदाज असतो. प्रत्यक्ष लिस्टिंग प्राइस किती असेल, याची कोणतीही हमी त्यातून मिळत नाही.
अनेक वेबसाइट्स, वृत्तपत्रे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे आकडे रोज प्रसिद्ध केले जातात. मात्र, हा कोणताही अधिकृत दर नसतो किंवा लिस्टिंगच्या दिवशी तितकाच नफा मिळेल याची कोणतीही हमी नसते. अलीकडच्या काही मोठ्या आयपीओंमध्ये जीएमपीचा अंदाज आणि प्रत्यक्ष लिस्टिंगची किंमत यात मोठी तफावत दिसून आली होती.
हे ही वाचा>>Personal Finance: ना चांदीची नाणी, ना विटा… तरी चांदीत गुंतवणूक! Silver ETF चं गणित समजून घ्या
सेबीने 'जीएमपी'वर आक्षेप का घेतला?
सेबीच्या मते, हे प्री-लिस्टिंग प्रीमियमचे आकडे पूर्णपणे अनधिकृत असतात. स्टॉक एक्स्चेंजच्या चौकटीबाहेर चालणाऱ्या या व्यवहारांवर कोणत्याही नियामकाची देखरेख नसते. येथे पारदर्शक किंमत निश्चितीची (Price Discovery) कोणतीही औपचारिक प्रक्रिया नसते आणि व्यवहार पूर्ण होण्याची (Settlement Guarantee) कोणतीही खात्री नसते.
तरीही, अनेकदा हे आकडे संभाव्य लिस्टिंग किंमत किंवा अपेक्षित परताव्याचे निदर्शक म्हणून सादर केले जातात. यामुळे सामान्य गुंतवणूकदारांची दिशाभूल होऊन त्यांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. ही पद्धत भांडवली बाजारातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याने, गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी जीएमपी प्रसिद्ध करणं थांबवणं आवश्यक असल्याचं सेबीने स्पष्ट केलं आहे.
व्यवहारात वाद झाल्यास कोणतंही संरक्षण नाही!
सेबीने आपल्या इशाऱ्यात गुंतवणूकदारांसाठी कायदेशीर संरक्षणाचा अभाव हा सर्वात मोठा धोका असल्याचं अधोरेखित केलं आहे. गुंतवणूकदाराने जीएमपीशी संबंधित व्यवहारात पैसे गुंतवले आणि त्यात फसवणूक किंवा वाद निर्माण झाला, तर त्याला औपचारिक भांडवली बाजारातील कोणतीही मदत मिळणार नाही. अशा वादात सेबी किंवा स्टॉक एक्स्चेंजच्या कार्यक्षेत्रातील गुंतवणूकदार संरक्षणाचे लाभ मिळणार नाहीत. स्टॉक एक्स्चेंजची तक्रार निवारण यंत्रणा वापरता येणार नाही. तसेच, एक्स्चेंज आणि डिपॉझिटरीजद्वारे चालवल्या जाणाऱ्या 'ऑनलाइन डिस्प्यूट रिझोल्यूशन' (ODR) पोर्टलचा आधारही घेता येणार नाही. एकंदरीत, जीएमपीच्या आधारे निर्णय घेऊन गुंतवणूक केली आणि तोटा झाला, तर दाद मागण्याची कुठलीही व्यवस्था उपलब्ध नाही.
गुंतवणूकदारांसाठी सेबीच्या महत्त्वाच्या सूचना
सेबीने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 2 गोष्टींचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलं आहे:
अंदाजांवर विसंबून राहू नका: जीएमपीकडे कधीही लिस्टिंगची किंमत किंवा अपेक्षित नफ्याचा निकष म्हणून पाहू नका.
अनधिकृत व्यवहारांपासून दूर राहा: जीएमपीशी निगडित कोणत्याही खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सहभागी होऊ नका, कारण ते पूर्णपणे नियामक चौकटीबाहेर आहेत.
हे ही वाचा>> Personal Finance: सरकारला कर्ज देऊनही कमावता येतो पैसा! जाणून घ्या सरकारी बाँड्सचं गणित
जीएमपीवर बंदी की फक्त आकड्यांच्या प्रसिद्धीवर लगाम?
सेबीच्या या निर्णयाबाबत एक महत्त्वाचा गैरसमज टाळणं गरजेचं आहे. सेबीने ग्रे मार्केटमधील सर्व व्यवहारांवर बंदी घातलेली नाही. मात्र, नोंदणीकृत मध्यस्थ आणि बाजारातील सहभागी घटकांनी जीएमपीचे आकडे प्रकाशित, प्रदर्शित किंवा प्रसारित करू नयेत, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे जीएमपीच्या आकड्यांची माहिती देणाऱ्या वेबसाइट्स, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि इतर माध्यमांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. मात्र, अनधिकृत ग्रे मार्केटमधील व्यवहार पूर्णपणे संपतील, असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल.
आयपीओमध्ये कंपनी महत्त्वाची की जीएमपी?
आयपीओ बाजारात आतापर्यंत अनेक गुंतवणूकदारांसाठी जीएमपी हा निर्णय घेण्याचा महत्त्वाचा आधार राहिला आहे. कंपनीचा अभ्यास करण्याआधी जीएमपी तपासण्याची सवयही अनेकांना लागली आहे. मात्र, सेबीच्या नव्या ॲडव्हायजरीमुळे या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
जीएमपीच्या आकड्यांवरून लिस्टिंग गेनचा अंदाज बांधणं सोपं वाटत असलं, तरी त्यामागे अधिकृत पडताळणी किंवा गुंतवणूकदार संरक्षणाची हमी नाही. त्यामुळे या आकड्यांना अंतिम निर्णयाचा आधार मानणं धोकादायक ठरू शकतं.
सेबीच्या या भूमिकेमुळे आयपीओ बाजारात कंपनीच्या आर्थिक स्थितीला, व्यवसायाच्या गुणवत्तेला आणि योग्य व्हॅल्युएशनला अधिक महत्त्व मिळण्याची अपेक्षा आहे. अर्थात, जीएमपीचे आकडे प्रकाशित होणं थांबलं तरी गुंतवणूकदारांच्या मनातील लिस्टिंग गेनची अपेक्षा लगेच संपणार नाही. पण आता केवळ एका अनधिकृत आकड्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक करण्याऐवजी कंपनीचा अभ्यास करणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT












