Mumbai Crime: मुंबई क्राइम ब्रांच युनिट 11 ने मुंबईतील एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांकडून 38 वर्षीय नरोत्तम शर्मा नावाच्या आरोपीला अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपीने शहरातील एका ज्योतिषीकडून तब्बल 74 लाख रुपये लुबाडले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी तरुणाने आपली प्रधानमंत्री कार्यालय (PMO) मध्ये चांगली ओळख असल्याचं पीडित व्यक्तीला आमिष दाखवलं. या प्रकरणातील आरोपीला अटक करून मुंबई पोलिसांनी मोठं यश संपादन केल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
म्हाडामध्ये दुकान मिळवून देण्याचं आमिष
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी शर्माने पीडित ज्योतिषाला म्हाडामध्ये दुकान मिळवून देण्याचं आमिष दाखवलं होतं. प्रधानमंत्री कार्यालयात चांगली ओळख असल्याने हे काम अगदी सहजपणे करून देणार असल्याचं आरोपी तरुणाने खोटं आश्वासन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित तरुणाचा विश्वास संपादन करण्यासाठी, आरोपीने सरकारी कार्यालयांचे बनावट सील देखील दाखवले असून ते पोलिसांनी आता जप्त केले आहेत. आरोपी शर्माला लगेच कोर्टात हजर करण्यात आलं असून पोलिसांनी सखोल चौकशीसाठी आणखी कस्टडीची मागणी केली आहे.
हे ही वाचा: डोंबिवली: "मोबाईलचा पासवर्ड कोणी बदलला?.." क्षुल्लक कारणावरून झालेला वाद टोकाला पोहोचला, पट्ट्यासह बेदम मारहाण अन्...
सरकारी विभागांचे बनावट सील
अधिकाऱ्यांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे अनेक सरकारी विभागांचे बनावट सील सापडले, ज्यामुळे त्याने अशाच प्रकारच्या घटनांमध्ये इतर लोकांना सुद्धा अडकवल्याचा संशय निर्माण होत आहे. पोलीस आता आरोपीच्या बँक खात्याची तपासणी करत असून त्याचे काही साथीदार किंवा सरकारी अधिकारी यात सामील आहेत का? याचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, या प्रकरणातील बऱ्याच बाबींचा उलगडा होऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: मुलाचं अपहरण केलं अन् आईला ब्लॅकमेल... शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव, नेमकं प्रकरण काय?
पोलिसांचं जनतेला आवाहन
आरोपीने ज्योतिषाचा विश्वास मिळवण्यासाठी त्याला खोटे स्टॅम्प दाखवले. या प्रकरणासंबंधी पोलिसांनी जनतेला आवाहन केलं आहे की जर त्यांना अशा कोणत्याही संशयास्पद घटनेची माहिती असेल तर त्यांनी यासंबंधीत त्वरित अधिकाऱ्यांना कळवावे. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच यासंबंधी आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ADVERTISEMENT
