Mumbai Crime: मुंबईच्या कांदिवली परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका 45 वर्षीय सिक्योरिटी गार्डने आपल्याच घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यासाठी पीडित व्यक्तीने त्याच्या लायसन्सी रिव्हॉल्वरचा वापर केला होता. संबंधित घटना मंगळवारी रोजी घडली असून यानंतर, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता, पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पीडित सिक्योरिटी गार्डच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
ADVERTISEMENT
ज्वेलरी शॉपमध्ये सिक्योरिटी गार्ड
प्रभाकर ओझा अशी मृताची ओळख समोर आली असून तो मुंबईच्या MIDC परिसरातील एका ज्वेलरी शॉपमध्ये सिक्योरिटी गार्ड म्हणून काम करत होता. प्रभाकर त्याच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीच्या पोईसर परिसरात राहत होता. तसेच, प्रभाकरकडे वैध लायसन्सी रिव्हॉवर होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित प्रभाकर ओझा सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे ज्वेलरी शॉपमध्ये ड्यूटीसाठी गेला होता. त्यानंतर, संध्याकाळी जवळपास 4 वाजताच्या सुमारास तो घरी परतला. घरी पोहोचल्यानंतर, तो त्याच्या पत्नी किंवा मुलांसोबत काहीच न बोलता थेट खोलीत गेला आणि खोलीचा दरवाजा आतून बंद केला. काही वेळानंतर, खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला आणि यामुळे घरातील लोक घाबरले.
हे ही वाचा: भ्रष्टाचाराच्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी करुच नयेत, राज थेट बोलले; ठाकरे बंधूंच्या संयक्त महामुलाखतीचा टीझर
स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली अन्...
गोळी झाडल्याचा आवाज ऐकून कुटुंबियांनी आरडाओरडा करून शेजारच्या लोकांना बोलवलं. आजूबाजूला राहणारे लोक तात्काळ प्रभाकरच्या घरी पोहोचले. दरम्यान, पोलिसांना सुद्धा या घटनेची माहिती देण्यात आली. बऱ्याच प्रयत्नानंतर, खोलीचा दरवाजा उघडण्यात आला आणि आतील दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. दरवाजा उघडल्यानंतर, जमिनीवर प्रभाकरचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर, पीडित व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांनी पीडित प्रभाकरला मृत घोषित केलं. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: महाचावडी: दोन 'ठाकरे' पहिल्यांदाच 'चावडी'वर एकत्र, Super Exclusive मुलाखत लवकरच मुंबई Tak वर!
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, पीडित प्रभाकरने ते ती रिव्हॉलवर उत्तर प्रदेशातील मेरठ येथून मिळवली होती. सध्या, पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. घटनेचं नेमकं कारण उघडकीस आणण्यासाठी मृताचे कुटुंबीय आणि त्याच्या ओळखीच्या लोकांची चौकशी केली जात आहे.
ADVERTISEMENT











