Prabodhankar Thackeray book controversy, Mumbai : मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात निवृत्ती कार्यक्रमादरम्यान प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकवाटपावरून वादंग निर्माण झाला आहे. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांना 'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' हे प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट दिल्यानंतर काही महिला कर्मचाऱ्यांनी त्याचा तीव्र विरोध करत संताप व्यक्त केला. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यावरच पुस्तकं फेकत त्याला सर्वांसमोर माफी मागण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडला आहे.
ADVERTISEMENT
ही घटना समोर आल्यानंतर रुग्णालय आणि महापालिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे. निवृत्त होत असलेले कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी 30 ऑगस्ट रोजी आपल्या निरोप समारंभात समाजजागृती करणारी काही पुस्तके वाटली होती. मात्र, प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक मिळाल्याने काही महिला कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करत त्यांनी कदम यांना आपल्या कक्षात बोलावून माफी मागण्यास भाग पाडले. यावेळी महिलांनी पुस्तकं फेकत त्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
"यांनी प्रबोधनकार वाचले आहेत का? हा मुर्खपणा आहे"
याबाबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, हा मुर्खपणा आहे. मुर्खपणाच्या सगळ्या हद्दी पार केल्यानंतर जो होऊ शकतो तो हा प्रकार आहे. मुळात यांना प्रबोधनकार माहिती आहेत का? यांनी प्रबोधनकार वाचले आहेत का? प्रबोधनकारांनी महाराष्ट्राला सुधारणावादी गोष्टींकडे नेलं. समाजातील अनिष्ट प्रथांच्या विरोधात त्यांनी लढा दिला. त्या प्रबोधनकारांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, असं आम्ही मानतो. सनातन धर्माच्या नावाखाली काही लोक समाजात विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. हे समाजासाठी घातक आहे. यांना मुळात सनातन धर्म देखील माहिती नाही. त्या महिलेने प्रबोधनकारांना हिंदूत्व विरोधी म्हणणे म्हणजे मुर्खपणा आहे. त्या महिलेची तक्रार आमचे पदाधिकारी योग्य पद्धतीने करतील.
या प्रकारानंतर बीएमसी एससी, एसटी, व्हिजेएनटी, एसबीसी, ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशनकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. संबंधित सहाय्यक अधिसेविका आणि परिचारिकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
"वाचनाला प्रोत्साहन देणे हा सामाजिक प्रबोधनाचा भाग"
संघटनेचे सरचिटणीस संजय कांबळे-बापेरकर यांनी सांगितले की, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित महाराष्ट्रात समाजप्रबोधन करणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीच अभिव्यक्ती आहे. पुस्तके लिहिणे, वितरीत करणे आणि वाचनाला प्रोत्साहन देणे हा सामाजिक प्रबोधनाचा भाग आहे. प्रत्येक महिलेनं प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार समजून घेणं आवश्यक आहे, कारण त्यांनी स्त्रीच्या मानसिक आणि सामाजिक गुलामीविरुद्ध आवाज उठवला होता, असेही ते म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
संतोष देशमुखांच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडचे बॅनर झळकवून पैसे मागणारा आहे तरी कोण?
ADVERTISEMENT
