DJचा घराखाली दणदणाट, वडिलांचा मृत्यू, मुलीने कॅमेऱ्यासमोर हंबरडा फोडला

मुंबई तक

10 Sep 2026 (अपडेटेड: 10 Sep 2026, 08:45 AM)

dj morcha pune : डीजेच्या मोठ्या आवाजामुळे वडिलांना उपचारासाठी गावाला न्यावं लागलं आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा वर्षा कदम यांनी केला आहे. डीजेला विरोध केल्यामुळे सोसायटीकडून त्रास आणि सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

dj morcha pune

dj morcha pune

Google CTA

बातम्या हायलाइट

point

DJचा घराखाली दणदणाट, वडिलांचा मृत्यू

point

मुलीने कॅमेऱ्यासमोर हंबरडा फोडला

DJ morcha pune : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये डीजेच्या मोठ्या आवाजाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विद्यानंद बापट यांनी डीजेच्या दणदणाटाविरोधात भूमिका घेतल्यानंतर अनेक नागरिकांनीही त्यांना पाठिंबा दिला. पुण्यात डीजेविरोधात मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चात पिंपरी चिंचवडमधील वर्षा कदम सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी डीजेमुळे आपल्या कुटुंबाला सहन कराव्या लागलेल्या त्रासाची कहाणी सांगितली. वर्षा कदम यांनी सांगितलं की, सुरुवातीला त्यांनाही डीजे आणि सणांमधील मोठा आवाज आवडायचा. मात्र, वडील आजारी पडल्यानंतर मोठ्या आवाजाचा त्रास किती गंभीर असू शकतो, हे त्यांना जाणवलं. त्यांच्या घराखाली साउंड सिस्टीम लावली जात होती. वडिलांची प्रकृती गंभीर होती आणि त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. त्यामुळे आवाज कमी करावा, अशी त्यांनी वारंवार विनंती केली होती.

हे वाचलं का?

हेही वाचा : ‘तुम तो धोखेबाज हो’ गाण्यावर डान्स, शालूचा Exclusive व्हिडिओ.. सासऱ्याची हत्या अन् मास्टरमाईंड सून पार्टीत बेधुंद!

पोलिस निघून गेल्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू केला जात असल्याचा आरोप

वर्षा कदम यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सोसायटीतील कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचीही विनंती केली. सोसायटीमध्ये क्लब हाऊस आणि गार्डनची जागा असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. पोलिसांना बोलावूनही पोलिस निघून गेल्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे वडिलांना घेऊन त्यांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. आजारी वडिलांना गावाहून स्वारगेटपर्यंत आणणं आणि पुन्हा घेऊन जाणं त्यांच्यासाठी त्रासदायक होतं. वडिलांचं वजनही 30 किलोने कमी झालं होतं आणि त्यांची प्रकृती खूपच कमजोर झाली होती. डॉक्टरांनी त्यांना जवळच्या वैद्यकीय सुविधेपासून दूर नेऊ नका, असं सांगितल्याचंही वर्षा कदम यांनी सांगितलं. तरीही नवरात्रीच्या काळात घराखाली कार्यक्रम घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.

हेही वाचा : मुंढवा जमीन घोटाळा, पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ? हायकोर्टानं काय सांगितलं?

गाडी बोलावण्यापूर्वीच वडिलांनी डोळ्यांसमोर श्वास सोडला

वर्षा कदम यांनी सांगितलं की, त्यांनी 23, 24 आणि 26 तारखेला साउंड सिस्टीम हलवण्याची विनंती केली होती. 26 तारखेला त्यांनी वडिलांना परत आणायचं असल्याचं सांगून सहकार्य करण्याची विनंती केली. मात्र, साउंड सिस्टीम हलवण्यात आली नाही. त्यानंतर त्या गावाला गेल्या. दोन दिवसांनी वडिलांना मोठ्या प्रमाणात धाप लागली. त्यांनी डॉक्टरांना व्हिडिओ पाठवला. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगून तातडीने रुग्णालयात नेण्यास सांगितलं. गाडी बोलावण्यापूर्वीच वडिलांनी त्यांच्या डोळ्यांसमोर श्वास सोडला. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. वडिलांचा शेवटचा श्वास ऑक्सिजनसाठी तडफडत गेल्याची भावना मनात राहिल्याचं वर्षा कदम यांनी सांगितलं. सोसायटीने माणुसकी दाखवून साउंड सिस्टीम दुसरीकडे हलवली असती तर आपण वडिलांना घरी आणून त्यांच्यावर उपचार करू शकलो असतो, असं त्या म्हणाल्या.

डीजेला विरोध केल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सोसायटीकडून आपल्याला वाळीत टाकल्याचा आरोपही वर्षा कदम यांनी केला. सोसायटीतील लोक आपल्याशी बोलत नाहीत, ग्रुपवरील संदेशांना उत्तर दिलं जात नाही आणि नोटिसांनाही प्रतिसाद मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. डीजेच्या आवाजामुळे स्वतःच्या कानाला आणि नसांना त्रास होत असल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यांच्या मुलालाही साउंड सिस्टीममुळे त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा त्यांनी केला. डीजेला विरोध करणं म्हणजे कोणत्याही सणाला विरोध करणं नाही, असं वर्षा कदम यांनी स्पष्ट केलं. आपण नास्तिक नसून हिंदू धर्मातील धार्मिक कार्यक्रम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्य सरकारने या विषयाकडे वैद्यकीय विज्ञानाच्या दृष्टीने पाहावं आणि माणसांना सहन होईल अशा मर्यादेत डीजेचा आवाज ठेवण्यासाठी व्यवस्था करावी, अशी त्यांची मागणी आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर डीजे बंद होतो आणि पोलिस गेल्यानंतर पुन्हा सुरू होतो, या प्रकाराकडेही प्रशासनाने लक्ष द्यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली.