Pune Crime: पुण्यातील एका संरक्षण संस्थेत (डिफेन्स इस्टॅब्लिशमेंट) तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या कर्नलची सायबर फसवणुक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पीडित तरुण ट्रॅफिक चालानच्या नावाखाली पाठवलेल्या बनावट सरकारी लिंकमुळे या आंतरराष्ट्रीय फसवणूकीच्या जाळ्यात अडकल्याची माहिती आहे. यामध्ये पीडित तरुणाच्या क्रेडिट कार्डमधून तब्बल 3.81 लाख बेकायदेशीरपणे उकळण्यात आले. यासंबंधी कर्नलने पुण्यातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
ADVERTISEMENT
वाहतूक चालानचा मॅसेज अन्...
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री उशीरा घडली. त्यावेळी, तक्रारदाराला त्याच्या मोबाईलवर एक संशयास्पद मॅसेज मिळाला. त्यामध्ये त्याच्या गाडीवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारण्यात येणार असल्याचं त्याला सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी कर्नलने त्या लिंकवर क्लिक केलं.
हे ही वाचा: पुणे : नामांकित डॉक्टरकडून मोलकरणीला चुकीचा स्पर्श अन् अश्लील चाळे, कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल
तब्बल 32,939 हाँगकाँग डॉलर्स दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर
मेसेजमधील लिंकवरून सरकारी पेमेंट पोर्टलसारखं दिसणारं एक वेबपेज ओपन झालं. त्या पेजवर 590 रुपयांचं ट्रॅफिक चालान दाखवण्यात आलं होतं. पेजची डिझाइन आणि भाषेवरून ती सरकारी वेबसाइटच वाटत होती. त्यामुळे, पीडित कर्नलचा त्यावर विश्वास बसला आणि त्याने तो दंड भरण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, त्याने आपल्या क्रेडिट कार्डची सर्व आवश्यक माहिती भरली आणि ओटीपी टाकून पेमेंट कन्फर्म केलं. मात्र, काही क्षणांतच, त्याच्या क्रेडिट कार्डमधून 32,939 हाँगकाँग डॉलर्स कापण्यात आले आणि ते थेट हाँगकाँगमधील एका हॉटेलच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.
हे ही वाचा: माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, आता त्यांच्या खात्याचा पदभार कोणाकडे? राष्ट्रवादीकडून मोठी अपडेट समोर
पोलिसांचं नागरिकांना आवाहन
आपल्या बँक खात्यातील मोठी रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाल्याने तक्रारदाराला त्याची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्याने त्वरीत पोलिसांशी संपर्क साधला आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आता, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, सायबर भामटे सरकारी संस्थांचे प्रतिनिधी असल्याचं भासवून एसएमएस, ईमेल किंवा मेसेजिंग अॅप्सद्वारे लोकांना धमकावणारे मॅसेज पाठवतात. अशातच, पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
ADVERTISEMENT











