Ketan Agrawal Pune Murder Case : पुणे ग्रामीण पोलिसांनी केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची वाढीव कोठडी सुनावण्यात आली आहे. सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास सुरू असून, डिजिटल पुरावे गोळा करणे आणि Scene Recreation करण्यावर भर दिला जात आहे. आजच्या सुनावणीत पोलिसांचे महत्त्वाचे दावे, बचाव पक्षाचा जोरदार विरोध आणि न्यायालयात झालेला वकिलांचा नाट्यमय वाद हे तीन मुद्दे अत्यंत चर्चेचे ठरले.
ADVERTISEMENT
पोलिसांकडून चेतन चौधरीने घातलेली पँट शोध सुरु
तपासाच्या दृष्टीने पोलीस आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी घटनास्थळाची पाहणी केली होती आणि कट रचला होता, हे तपासात स्पष्ट झाले आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने सिया गोयलच्या उपस्थितीत घटनास्थळी Scene Recreation करण्यात आले असून, चेतन चौधरीचे Recreation बाकी आहे. दरम्यान, गुन्हा घडल्यानंतर आरोपीने घातलेले कपडे आणि वापरलेला मोबाईल यातील डिजिटल डेटा डिलीट करण्यात आला होता, तो आता रिकव्हर करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. यासोबतच, चेतन चौधरीने गडावर घातलेली आणि नंतर गायब केलेली पँट शोधणे हे तपासाचे मुख्य उद्दिष्ट बनले आहे.
ही अटक पूर्णपणे बेकायदेशीर, सियाच्या वकिलांचा युक्तिवाद
बचाव पक्षाच्या वकिलांनी, विशेषतः सिया गोयलच्या वतीने युक्तिवाद करताना, ही अटक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत, पोलिसांनी तपासात सहकार्य मिळत असतानाही कोठडी का वाढवून मागितली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केवळ संशयावरून इतक्या तरुण मुलांना कोठडीत ठेवणे चुकीचे असल्याचे सांगत, तपास पूर्ण झाला असून कोणतीही नवीन माहिती मिळण्याची शक्यता नाही, असा दावा बचाव पक्षाने केला. तसेच केतन अग्रवालचा मोबाईल आधीच पोलिसांकडे सोपवण्यात आला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वकिलांबाबत झालेला गोंधळ
आजच्या सुनावणीचे सर्वात नाट्यमय वळण म्हणजे न्यायालयात सिया गोयलच्या वकिलांबाबत झालेला गोंधळ. आशुतोष श्रीवास्तव नावाचे वकील स्वतःला तिचे वकील असल्याचे सांगून बाजू मांडत होते, मात्र सिया गोयल आणि तिचे भाऊ साहिल गोयल यांनी लेखी प्रतिज्ञापत्राद्वारे (Affidavit) ते आपले वकील नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी विपुल दुशिंगे हेच अधिकृत वकील असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या कामकाजादरम्यान सियाने स्वतः उभे राहून श्रीवास्तव आपले वकील नसल्याचे ठामपणे सांगितल्याने उपस्थितांमध्ये चर्चांना उधाण आले होते.
ADVERTISEMENT











