ADVERTISEMENT
Ketan Agrawal Murder : पुण्यातील लोहगड हत्या प्रकरणात आता नवे दावे समोर आले आहेत. आरोपी सिया गोयल आणि मृत केतन अग्रवाल हे मुंबईला जात असताना ज्या कॅबने प्रवास केला होता, त्या कॅब चालकाने माध्यमांशी बोलताना अनेक बाबींवर भाष्य केले आहे. मुंबईकडे जाताना गाडीत काय घडले, प्रवासादरम्यान कोण उपस्थित होते आणि केतन अग्रवालच्या पासपोर्टबाबत नेमके काय झाले? याबाबत चालकाने आपली बाजू मांडली आहे. या दाव्यांमुळे प्रकरणाच्या तपासात नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : लोहगड हत्या केस: चेतनसाठी 'तो' होता इशारा.. सिया खाली वाकली अन् केतनचा खेळ खल्लास!
पासपोर्ट गाडीत राहिल्याचा दावा, पुढे काय घडलं?
कॅब चालक वैभव जाधव याने सांगितले की, त्यांना पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी रात्री सुमारे 10 वाजता बुकिंग मिळाले होते. गाडीत केतन अग्रवाल, सिया गोयल, आणि आणखी एक तरुणी प्रवास करत होते. प्रवासादरम्यान एक्सप्रेसवेवरील एका फूड मॉलवर गाडी थांबवण्यात आली. त्यावेळी सिया गोयल यांनी गाडीची डिक्की उघडण्यास सांगितले. चालकाने डिक्की उघडली, मात्र सामानाकडे विशेष लक्ष दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सर्वजण पुन्हा प्रवासाला निघाले आणि विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना फोन करून पासपोर्ट गाडीत राहिल्याचा दावा करण्यात आला.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात अतिमुसळधार मान्सून, 29 जिल्ह्यांवर मोठं संकट
केतन आणि सिया यांच्यात वाद सुरू होता
चालकाने पुढे बोलताना सांगितले, फोन आल्यानंतर त्यांनी गाडीची तपासणी केली आणि व्हिडिओ कॉलद्वारेही गाडी दाखवली, मात्र त्यांना पासपोर्ट सापडला नाही. त्यानंतर संबंधितांना विमानतळावर येण्यास सांगण्यात आले. चालकाच्या म्हणण्यानुसार, प्रवासादरम्यान गाडीत केतन आणि सिया यांच्यात वाद सुरू होता. मात्र, त्यांनी हेडफोन लावले असल्यामुळे त्या वादाचे नेमके कारण किंवा संभाषण त्यांनी ऐकले नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, डिक्कीमधून सिया गोयल यांनी नेमके काय घेतले, हे आपण पाहिले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कॅब चालकाने स्वतः पासपोर्ट फाडल्याची घटना प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले नाही. मात्र, पासपोर्ट गाडीत पडलाय का? हे पडताळून पाहाण्यासाठी मला सांगण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणात पुढील सुनावणीदरम्यान आरोपी चेतन आणि सिया यांना पुन्हा पोलिस कोठडी मिळते का, याकडे लक्ष लागले आहे. लोहगड हत्या प्रकरणात मुंबईला जाणाऱ्या कॅबच्या चालकाने प्रवासादरम्यान घडलेल्या घटनांबाबत महत्त्वाचे दावे केले आहेत. केतनच्या पासपोर्टप्रकरणामुळे तपासात नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT











