Pune Accident News : पुण्यातील पाषाण भागात भरधाव कारने आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या वीरेंद्र द्विवेदी यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. पाषाण ते विद्यापीठाला जोडणाऱ्या नेकलेस रोडवर सकाळी सुमारे सात वाजता हा अपघात झाला. द्विवेदी हे रस्त्याने चालत जात असताना किंवा रस्ता ओलांडण्यासाठी गेले असताना मागून आलेल्या काळ्या रंगाच्या टोयोटा इनोव्हा कारने त्यांना धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या धडकेत त्यांच्या डोक्याला मार लागला आणि नाकातून रक्त आले. त्यानंतर त्यांना कारमध्ये टाकून बावधन परिसरातील चेराराम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू घटनास्थळीच झाल्याचे स्पष्ट केले. अपघाताच्या ठिकाणी वॉचमन आणि इतर लोकही उपस्थित होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather : गणेशोत्सवाच्या आगमनादिवशी वरुणराजाची दमदार हजेरी, IMD चा अलर्ट
वेगमर्यादा पाळली गेली होती का?
अपघात झाल्यानंतर संबंधित कारचा क्रमांक एमए 12 वायएस 0622 असल्याची माहिती समोर आली. या क्रमांकाच्या वाहनाचा मालक ब्लू रेस डेव्हलपर्स एलएलपी असल्याचे समोर येत आहे. वाहनाच्या कागदपत्रांमध्ये टू रेंज हिल कॉर्नर, गणेश खिंड रोड, पुणे सिटी, पुणे असा पत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाषाणचा हा रस्ता रहदारीचा असून या मार्गावर सकाळच्या वेळी सायकलिंग, जॉगिंग आणि चालण्यासाठी येणारे नागरिकही असतात. या परिसरात विविध संस्था आणि प्रयोगशाळा आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. अपघाताच्या वेळी कारचा वेग किती होता, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून या ठिकाणी वेगमर्यादा पाळली गेली होती का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : पोलिसांनी मुंबईतील आंदोलनाची परवानगी नाकारली, आता मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया
FIR मध्ये आरोपीचं नाव नाही, अनोळखी व्यक्ती म्हणून उल्लेख
या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यास झालेल्या विलंबावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सकाळी सात वाजता अपघात झाल्यानंतर दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत एफआयआर दाखल झालेली नव्हती, असा दावा द्विवेदी यांच्या मित्रांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर संध्याकाळी चार वाजता एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. एफआयआरमध्ये आरोपीचे नाव अनोळखी व्यक्ती असे नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. द्विवेदी यांचा भाऊ आणि त्यांचे मित्र पोलीस ठाण्यात आले होते. घटनास्थळी पंचनामा आणि इतर प्रक्रिया झाल्यानंतरही एफआयआर घेण्यास इतका वेळ का लागला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणातील 19 वर्षीय तरुणाने अपघातानंतर द्विवेदी यांना आपल्या कारमध्ये टाकून रुग्णालयात नेले. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला तात्काळ जामीन देण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुणाने अपघातानंतर जखमी व्यक्तीला कारमधून रुग्णालयात नेले असल्याने हा प्रकार हिट अँड रनच्या व्याख्येत येत नाही. मात्र, संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते आणि त्याला जामीनही देण्यात आला, तर एफआयआरमध्ये त्याचे नाव थेट का नमूद करण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यास झालेला विलंब, आरोपीचे नाव अनोळखी का ठेवण्यात आले आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत आणखी काही प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे.
ADVERTISEMENT












