Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोणवडी येथे असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) शिक्षणासाठी आलेल्या एका 23 वर्षीय विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्याने चाकूने भोसकून खून केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक परिसरात खळबळ उडाली असून तरुणांमधील वाढत्या हिंसक प्रवृत्तीबद्दल सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सोलापूर विधानपरिषद : गोरे म्हणाले विरोधकांकडे 16 मतंही नाहीत, आता धैर्यशील मोहितेंचं जोरदार प्रत्युत्तर
मृत विद्यार्थ्याचे नाव सौरभ संतोष साखरे (वय 23, रा. चिंचपूर, ता. धारूर, जि. बीड) असे असून तो आयटीआयमध्ये प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. या घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
धारदार चाकूने सौरभवर अचानक हल्ला
प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री सौरभ आणि त्याच्या वर्गातील अमेय भिकाजी कोकरे (वय 19) हे दोघेही संस्थेच्या टेरेसवर झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास दोघांमध्ये नक्की कोणत्या कारणावरून वाद झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या वादाचे रूपांतर थेट रक्ताच्या खेळात झाले आणि संशयित आरोपी अमेयने आपल्याकडील धारदार चाकूने सौरभवर अचानक हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सौरभच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून बीड जिल्ह्यातून त्याचे नातेवाईक मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.
हेही वाचा : 'तू उशीरा का आलीस?' हात-पाय बांधले अन् गरम इस्त्रीने...; पोलिसानं हे काय केलं?
आरोपी अमेय कोकरे याला अटक
घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलीस ठाण्याचे पथक तातडीने गोणवडी येथे पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी अमेय कोकरे याला त्वरित अटक केली आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत. दोघा विद्यार्थ्यांमध्ये काही पूर्ववैमनस्य होते का किंवा रागाच्या भरात हा प्रकार घडला, याचा छडा पोलीस लावत आहेत. या घटनेमुळे आयटीआयमधील विद्यार्थ्यांमध्ये आणि परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण आंबेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू असून, या खुनामागील कारणे लवकरच स्पष्ट होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. घोडेगाव पोलीस अधिक तपास करत असून, या खूनाच्या घटनेने शैक्षणिक संस्थेच्या सुरक्षेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ADVERTISEMENT











