Mumbai News : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच मुंबईकरांना पहिले अधिकृत 'पेडेस्ट्रियन झोन' म्हणजेच पादचारी क्षेत्र मिळणार आहे. ऐतिहासिक अशा काळा घोडा परिसरात हा झोन तयार होत आहे. येथील 'नो-व्हेईकल झोन' म्हणजेच वाहनमुक्त क्षेत्राचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. तर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काळा घोडा हा मुंबईतील पहिला अधिकृत 'पेडेस्ट्रियन झोन' म्हणजेच पादचारी क्षेत्र म्हणून ओळखला जाईल.
ADVERTISEMENT
रस्त्यांचे नूतनीकरण
मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी गुरुवारी (4 जून) काळा घोडा परिसरातील या सुशोभीकरणाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. या प्रकल्पांतर्गत काळा घोडा परिसरातील व्ही. बी. गांधी मार्ग (फोर्ब्स स्ट्रीट), रोपवॉक लेन, साईबाबा रोड, रुदरफिल्ड स्ट्रीट आणि बी. भरूचा रोड या प्रमुख रस्त्यांचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले असून, पादचाऱ्यांसाठी हे रस्ते सज्ज करण्यात आले आहेत.
हे ही वाचा : सोलापूर विधानपरिषद : गोरे म्हणाले विरोधकांकडे 16 मतंही नाहीत, आता धैर्यशील मोहितेंचं जोरदार प्रत्युत्तर
'असा' असेल प्रकल्प
या नवीन सुशोभीकरण प्रकल्पानुसार, शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी या संपूर्ण परिसरात वाहनांच्या प्रवेशाला पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे. यासाठी परिसराच्या सर्व प्रवेशद्वारांवर आधुनिक 'बोलार्ड्स' (सुरक्षा खांब) बसवले जातील. शनिवार-रविवार हा परिसर केवळ पादचाऱ्यांसाठीच राखीव असेल, जिथे कला, हस्तकला आणि संगीत क्षेत्राशी संबंधित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन केले जाईल. यामुळे मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक मोठे आणि मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
हे ही वाचा : 'तू उशीरा का आलीस?' हात-पाय बांधले अन् गरम इस्त्रीने...; पोलिसानं हे काय केलं?
'हे' असणार मुख्य आकर्षण
या संपूर्ण प्रकल्पाचे मुख्य आणि विशेष आकर्षण म्हणजे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या प्रतिभावान कलाकारांनी तयार केलेले चार अत्यंत सुंदर आणि देखणे शिल्प आहेत, जे या भागात बसवण्यात आले आहेत. याशिवाय, संपूर्ण परिसरात दगडांनी बनवलेले सुबक पादचारी मार्ग (स्टोन-पेव्हड पाथ) तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईकरांना आणि पर्यटकांना या ऐतिहासिक परिसराचा आनंद वाहनांच्या अडथळ्याविना घेता यावा, या उद्देशाने ही विशेष संकल्पना राबवली जात आहे.
ADVERTISEMENT











