Pune Crime News : पुण्यातील चिंचवड परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. मृताचे नाव नकुल भोईर (वय 40) असून, आरोपी पत्नीचे नाव चैताली नकुल भोईर (वय 28) असे आहे. घटनेनंतर पोलिसांनी चैतालीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT
भोईर दाम्पत्यामध्ये सातत्याने होत होते वाद
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नकुल आणि चैताली यांचं गेल्या काही वर्षांपासून वैवाहिक जीवनात सतत वाद सुरू होते. नकुलला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे. गुरुवारी मध्यरात्री पुन्हा त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले. या वादातून चैतालीने घरात असलेल्या कपड्याने नकुलचा गळा आवळला. काही वेळातच नकुलचा जागीच मृत्यू झाला. या घटनेवेळी त्यांची दोन आणि पाच वर्षांची मुलं आतल्या खोलीत झोपलेली होती. बाहेरच्या खोलीत मात्र हा भयानक प्रकार घडला.
हेही वाचा : सरकारी रुग्णालयातील शौचालयात 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
पतीच्या संशय घेण्याच्या स्वभावामुळे पत्नीच्या आयुष्यात तणाव वाढला
पहाटे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या चिंचवड पोलिसांनी पंचनामा करून आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत, पतीकडून सतत होणाऱ्या संशय आणि वादामुळे चैतालीचा संयम सुटल्याचं पोलिसांना समजलं आहे. नकुल आणि चैताली दोघं मिळून साडी सेंटरचा व्यवसाय चालवत होते. व्यावसायिक कामातही दोघांमध्ये मतभेद होते. चैतालीला पुढे कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करायचं होतं, मात्र वारंवार होणारे घरगुती वाद आणि पतीच्या संशयामुळे तिच्या आयुष्यात तणाव वाढला होता. अखेरीस या वैवाहिक वादाचा शेवट खूनात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “ही घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. पत्नीने कपड्याने गळा आवळून पतीची हत्या केली आहे. आरोपी चैताली भोईरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे,” अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली. या घटनेमुळे चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











