Pune News : पुण्यातील एका उच्चभ्रू कुटुंबातील लग्न फक्त 45 दिवसांत मोडल्याचं समोर आलंय. लग्न झाल्यानंतर 25 ते 30 दिवसानंतर दाम्पत्यामधील वाद इतके चिघळले की, दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, हा घटस्फोट सध्या चर्चेचा विषय बनलाय. कारण दाम्पत्याने केवळ 45 दिवस संसार केला. मात्र, नवऱ्याला त्याच्या घटस्फोटीत पत्नीला पोटगी म्हणून 45 लाख रुपये द्यावे लागले आहेत.
ADVERTISEMENT
पत्नीने पतीविरोधात दाखल केली होती तक्रार
अधिकची माहिती अशी की, पुण्यातील एका नामांकित कुटुंबातील मुलगा आणि मुलीचे लग्न दीड महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात झाले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होते. परंतु लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. केवळ 45 दिवसांत परिस्थिती इतकी बिघडली की संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला. सतत वाद होऊ लागल्याने पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र दोन्ही कुटुंबीयांच्या चर्चेनंतर, वकील आणि पोलिसांच्या उपस्थितीत समझोता करण्यात आला. या समझोत्याअंतर्गत पत्नीने आपली तक्रार मागे घेतली आणि बदल्यात पतीने तिला 45 लाख रुपये पोटगी स्वरूपात देण्यास मान्यता दिली.
दीड महिन्यांत संसार मोडल्यामुळे विवाह चर्चेत
पुण्यातील सामाजिक वर्तुळात हा घटस्फोट चर्चेचा विषय ठरला आहे. केवळ दीड महिन्यांत संसार मोडल्यामुळे हा विवाह चर्चेत आला. विशेष म्हणजे, इतक्या अल्पावधीत इतक्या मोठ्या रकमेची पोटगी मिळाल्याचे प्रकरण दुर्मिळ असल्याने त्यावर लोकांमध्ये चर्चा रंगली आहे. या समझोत्यामुळे पत्नीने न्यायालयीन लढाई टाळत आपली तक्रार मागे घेतली असून आता दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत.
ADVERTISEMENT
