Pune News: पुण्यातील यवतमध्ये मंगळवारी (29 जुलै) एका सोशल मीडिया पोस्टवरुन मोठा वाद पेटल्याची घटना घडली होती. त्यावेळी काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्या असल्याची माहिती आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
सूत्रांच्या माहितीनुसार, गावातील व्हॉट्अॅप ग्रुपवर एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. संबंधित पोस्टचा विषय आणि भाषेवरुन स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली. वाद वाढत गेला आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर आले. प्रत्युत्त देण्यासाठी दुसऱ्या पक्षाचे लोकही रस्त्यावर आले. वादाने हिंसक स्वरुप घेत दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली आणि संतप्त जमावाने पोस्ट टाकणाऱ्या तरुणाच्या घरावर दगडफेक केली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून टायर जाळण्यात आले आणि रस्त्यावर तसेच संपूर्ण परिसरात खळबळ माजली.
पोलिसांनी घटनास्थळी केला लाठीचार्ज
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी सांगितल्याप्रमाणे, केवळ 30 मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. प्रकरणाची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "आम्ही खूप मर्यादित फोर्सचा वापर केला. आमच्या टीमने स्थानिक लोकांशी बोलून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि शांतता प्रस्थापित केली."
गावात तणावाचं वातावरण असूनही, पोलिसांनी मर्यादित फोर्सचा वापर करुन मोठा हिंसाचार होण्यापासून टाळला. एसपी गिल यांच्या मते, गावकऱ्यांनीही सहकार्य केले आणि सर्वांनी मिळून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पूर्ण घटना
पुण्यातील वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, परिसराच्या बाहेरील व्यक्तीने पोस्ट केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे हा तणाव निर्माण झाला. समाजात तणाव पसरण्यासाठी काही लोक जाणूनबुजून अशा पोस्ट पोस्ट करतात. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही कोणत्याही धर्मावर भाष्य करण्याचे स्वातंत्र्य नाही. कोणत्याही सभेमुळे किंवा कार्यक्रमामुळे तणाव निर्माण झाला, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे."
आता परिसरातील तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आली असून स्थानिकांशी संवाद साधण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच, लोकांनी शांतता प्रस्थापित करुन कायदा हातात न घेण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे.
ADVERTISEMENT
