'बरमुडा घालून सिंहगडावर का आलात?' संस्कृती रक्षकांकडून मारहाण

मुंबई तक

19 Aug 2026 (अपडेटेड: 19 Aug 2026, 08:45 AM)

Pune Sinhagad Fort assault Case : सिंहगडावर कपड्यांवरून पर्यटकांना अडवून मारहाण केल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गडावरील वाढती गर्दी, हुल्लडबाजी आणि ‘संस्कृती रक्षणा’च्या नावाखाली होणाऱ्या हस्तक्षेपावर या घटनेने प्रश्न उपस्थित केले आहेत.

Pune Sinhgad Assult Case

Pune Sinhgad Assult Case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'बरमुडा घालून सिंहगडावर का आलात?'

point

संस्कृती रक्षकांकडून मारहाण

Pune Sinhagad Fort assault Case : सुट्टीच्या दिवशी सिंहगड, लोणावळा आणि पुणे परिसरातील किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र, या गर्दीतून हुल्लडबाजी, वाद आणि मारहाणीच्या घटना समोर येत असून सिंहगडावरील एका घटनेने गडावरील पर्यटकांच्या सुरक्षिततेचा आणि ‘संस्कृती रक्षणा’च्या नावाखाली होणाऱ्या हस्तक्षेपाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हे वाचलं का?

शनिवार आणि रविवारची सुट्टी आली की पुणे, मुंबई तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक वीकेंड प्लॅन करत सिंहगड, लोनावळा आणि पुणे जिल्ह्यातील विविध किल्ल्यांवर फिरण्यासाठी जातात. सोशल मीडियावरही या ठिकाणच्या तुडुंब गर्दीचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. अनेक तरुण केवळ पर्यटन आणि मजामस्तीसाठी येतात, तर काही जण किल्ल्याचा इतिहास समजून घेण्यासाठीही येतात. मात्र, वाढत्या गर्दीमुळे काही घटना घडताना देखील पाहायला मिळत आहेत. 15 ऑगस्टला सिंहगडावर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. गर्दीचा फायदा घेऊन काही मुलींना चुकीचा स्पर्श केल्याच्या आरोपातून हा वाद झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेत एका व्यक्तीने दगड उचलल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत होते.

हेही वाचा : Personal Finance: महिन्याला 5000 वाचवण्यासाठी 10 Practical उपाय, आजपासूनच करा सुरुवात!

‘तुम्हाला हिंदू संस्कृती समजते का?’ असे म्हणत दमदाटी

यानंतर 16 ऑगस्ट रोजी सिंहगडावर कुटुंबासोबत गेलेल्या अवधूत पांडुरंग पाटील यांनी दिलेल्या तक्रारीमुळे आणखी एक घटना समोर आली. पाटील हे पत्नी , मुलगा, पुतण्या आणि मित्र जोसेफ डिसूझा यांच्यासोबत सिंहगडावर गेले होते. त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी भेट देऊन फोटो काढले. तेथून पुढे जात असताना समस्त हिंदू बांधव आर्मीशी संबंधित सात ते आठ मुला-मुलींनी त्यांना अडवले. ‘बरमुडा घालून का आला’, ‘फोटो का काढता’ आणि ‘खाली जा’, असे म्हणत त्यांच्याशी वाद घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पाटील यांनी ‘आम्ही जात आहोत, आता तुम्ही आम्हाला मारणार आहात का?’ असे विचारल्यानंतर तीन मुलांनी त्यांना चापटीने मारहाण केली. एका मुलीने त्यांच्या पत्नीचा हात पकडून गर्दीत ओढत नेले आणि ‘तुम्हाला हिंदू संस्कृती समजते का?’ असे म्हणत दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

हेही वाचा : Raksha Bandhan 2026 Date: रक्षाबंधन 27 की 28 ऑगस्टला? जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

तरुणींनाही कपड्यांवरून आणि फोटो काढल्यावरून अडवून मारहाण

पाटील कुटुंब खाली येत असताना त्यांना पोलिसांची गाडी दिसली. त्यांनी गाडी थांबवून पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याचवेळी इतर काही तरुण-तरुणींनाही कपड्यांवरून आणि फोटो काढल्यावरून अडवून मारहाण केल्याचे समोर आले. तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात संकेत संजय पाटील, आशिष दिलीप अपार, रेवन नारायण कोकाटे, सायली सुजित चव्हाण, केतकी सुरज जाधव, अमर रामचंद्र शिरके, कुणाल किसान नलावडे आणि आर्या प्रवीण कवडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गडाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक स्थळाचा सन्मान राखणे आवश्यक असले, तरी पर्यटकांच्या कपड्यांवर किंवा वर्तनावर आक्षेप असल्यास त्यांना समज देणे आणि माहिती देणे शक्य आहे. मात्र, मारहाण करणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिंहगडावर ठराविक संख्येने किंवा टप्प्याटप्प्याने पर्यटकांना प्रवेश देण्याबाबतही विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.