पुणे : पुण्यातील गजानन मारणे टोळीतील सक्रिय सदस्य आणि गुंड म्हणून ओळखला जाणारा रुपेश मारणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. कोथरूड पोलिसांनी आंदगाव (ता. मुळशी) येथून रुपेश मारणेला सिनेस्टाईल कारवाई करत अटक केली आहे.
ADVERTISEMENT
आंदगाव परिसरात धाड टाकत रुपेश मारणेला अटक
मिळालेल्या माहितीनुसार, रूपेश मारणे हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत फरार झाला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी सापळे रचले होते, मात्र तो सतत ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. शेवटी कोथरूड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आंदगाव परिसरात धाड टाकत त्याला जेरबंद केले.
हेही वाचा : निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, 12 राज्यांमध्ये सुरू होणार SIR चा दुसरा टप्पा.. महाराष्ट्राबाबत काय ठरलं?
रूपेश मारणे आणि गजानन मारणे यांच्यावर कोथरूड येथील एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर गजानन मारणे याला पोलिसांनी आधीच अटक केली होती, मात्र रूपेश मारणे हा फरार राहिला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गजानन मारणे तुरुंगात गेल्यानंतर रूपेश मारणे हा 'मारणे टोळी'चे सूत्र स्वतःकडे चालवत होता. टोळीतील अनेक गुंडांशी त्याचे संबंध असून, परिसरातील खंडणी व दहशतीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
शहरातील कुख्यात गज्या मारणे टोळीवर मोठी कारवाई करत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मकोका (MCOCA) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. शेअर बाजारात गुंतवलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करून शेअर दलालाचे अपहरण व मारहाण केल्याप्रकरणी गज्या मारणे आणि त्याच्या 15 साथीदारांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यानंतर गज्या मारणे आणि काही गुंडांना अटक झाली होती, मात्र रूपेश मारणे आणि काही साथीदार त्यानंतर फरार झाले होते. दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात एका व्यावसायिकाकडून 1 कोटी 85 लाख रुपये व्याजाने घेतल्यानंतर, त्याने 2 कोटी 30 लाख रुपये परत दिले असतानाही टोळीतील सदस्यांकडून अजून 65 लाख रुपयांची मागणी करत त्याला धमकाविण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात रूपेश मारणेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गंभीर प्रकरणांनंतर रूपेश मारणे पोलिसांच्या शोधात होता. गज्या मारणेच्या अटकेनंतर टोळीची सूत्रं स्वतःकडे घेतलेल्या रूपेश मारणेला अखेर पोलिसांनी अटक केली असून, पुढील चौकशी सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











