Badlapur News : बदलापुरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्री-प्रायमरीत शिक्षण घेणाऱ्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीसोबत स्कूल व्हॅनच्या चालकाने कथितरित्या छेडछाड केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी तक्रार दाखल होताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी व्हॅन चालकाला अटक केली असून संबंधित स्कूल व्हॅन जप्त करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : दुकानाबाहेर महिलेच्या लेहंग्यातून पडला तुपाचा डबा, झडती घेताच 30 हजारांचं सामान... चित्रपटाला लाजवेल अशी घटना
घाबरलेल्या मुलीनेच सांगितला सगळा प्रकार
ही घटना गुरुवारी (22 जानेवारी) घडली. दुपारी साडेबारा वाजता नेहमीप्रमाणे मुलगी घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. जवळपास एक तासाच्या उशिरानंतर मुलगी घरी आली. घरच्यांनी विचारपूस केली असता सुरुवातीला ती काहीच बोलली नाही. मात्र ती घाबरलेली असल्याचे लक्षात आल्यानंतर वारंवार विचारल्यावर तिने स्कूल व्हॅन चालकाने आपल्यासोबत चुकीची हरकत केल्याचे सांगितले.
नागरिकांकडून स्कूल व्हॅनची तोडफोड
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी प्रथम शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली आणि त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले. घटनेची माहिती पसरताच परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोडही केली.
हे ही वाचा : बिर्यानीतून नवऱ्याला नशायुक्त पदार्थ दिला, प्रियकराच्या मदतीने तोंड दाबून संपवलं मृतदेहाजवळ अश्लील व्हिडीओ पाहिले
स्कूल व्हॅनसंबंधी गंभीर बाब समोर
तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. ज्या व्हॅनमधून शाळेतील मुलांची वाहतूक केली जात होती, ती खासगी नंबर प्लेटवर चालवली जात होती. आरटीओच्या नियमानुसार शाळेतील मुलांच्या वाहतुकीसाठी पिवळ्या रंगाची नंबर प्लेट आणि टी-परमिट असणे बंधनकारक आहे. मात्र या प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरटीओची भूमिका आणि शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि शालेय वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT











