Beed Crime News, बीड : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा माणुसकी हादरवणारी आणि समाजाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. माजलगाव तालुक्यात ऊसतोडणीसाठी परराज्यातून आलेल्या मजुराच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विश्वासाचा मुखवटा घालून वावरणारे गावातीलच लोक किती क्रूर असू शकतात, याचा हा भयावह प्रत्यय आहे. त्यामुळे बीड आहे का नरक? असा सवालही उपस्थित केला जातोय.
ADVERTISEMENT
किराण दुकानदाराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातून 14 कुटुंबे माजलगाव तालुक्यात ऊसतोडणीच्या कामासाठी वास्तव्यास आली होती. ही कुटुंबे तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहत होती. 24 डिसेंबर रोजी दुपारी साधारण बारा वाजण्याच्या सुमारास मुलींचे वडील व नातेवाईक शेतात ऊसतोडणीसाठी गेले होते. त्या वेळी दोन अल्पवयीन मुली झोपडीत एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेत गावातीलच किराणा दुकानदार गणेश राजेभाऊ घाटूळ आणि त्याचा मित्र, ट्रॅक्टर चालक अशोक भास्कर पवार यांनी तिथे येत घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : BMC Election: भाजपची 137 जणांची यादी आली समोर, तुमच्या वॉर्डात कोण आहे भाजपचा उमेदवार?
दोघांनीही मुलींना जबरदस्तीने झोपडीतून ओढत बाहेर नेले. गणेश घाटूळ याने एका मुलीला उसाच्या शेतात नेले, तर अशोक पवार याने दुसऱ्या मुलीला कपाशीच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर “ही गोष्ट कुणाला सांगितली तर ठार मारू,” अशी दहशत निर्माण करणारी धमकी देण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या आणि मानसिक धक्क्यात असलेल्या मुलींनी काही दिवस हा प्रकार कुणालाही सांगितला नाही.
घटना तात्काळ उघडकीस न येता चार दिवसांनी समोर आली. 28 डिसेंबर रोजी एका पीडित मुलीने हिंमत करून आपल्या वडिलांना आपबीती सांगितली. त्यानंतर दुसऱ्या मुलीनेही तिच्यासोबत घडलेला प्रकार मामाला सांगितला. सत्य बाहेर येताच ऊसतोड मजुरांनी तात्काळ माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश घाटूळ आणि अशोक पवार या दोघांविरोधात गुन्हे दाखल केले असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणानंतर प्रशासनाकडून पीडित मुलींच्या संरक्षण आणि पुनर्वसनासाठी पावले उचलण्यात आली. बुधवारी दोन्ही पीडितांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी मुलींची सविस्तर माहिती घेत पालकांशी संवाद साधला. पुढील मदतीसाठी ही माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे देण्यात आली. त्यानंतर बालहक्क कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी पीडितांची भेट घेऊन त्यांचे समुपदेशन केले. मनोबल वाढवणे, कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगणे तसेच मनोधैर्य व इतर शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
दरम्यान, ऊसतोड मजुरांसारख्या स्थलांतरित कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कामाच्या शोधात आलेल्या कुटुंबांतील लहान मुलींच्या संरक्षणासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. बीड जिल्हा नेमका काय दिशा घेतो आहे, असा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
हेही वाचा : पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीवर दिवसाढवळ्या गोळीबार, शहरात खळबळ
ADVERTISEMENT











