रात्री घराबाहेर पडली अन् अचानक गायब! बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाने खळबळ

मुंबई तक

• 08:00 AM • 02 Sep 2026

बीडच्या केज तालुक्यात आजोळच्या घरी राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री घराबाहेर पडलेल्या मुलीला सिल्व्हर रंगाच्या स्विफ्ट कारमधून नेल्याचा संशय असून केज पोलिसांकडून तपास सुरू आहे.

beed-minor-girl-kidnapped-from-maternal-grandparents-home-kej-police

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाने खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

Google CTA

रोहिदास हातागळे, बीड : बीडच्या केज तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याच्या दारूच्या व्यसनामुळे आणि सततच्या भांडणाला कंटाळून माहेरी आई-वडिलांकडे राहणाऱ्या महिलेच्या नववीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीचे रात्रीच्या वेळी अपहरण करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून केज पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

आईसोबत माहेरी राहत होती महिला

मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका महिलेचे लग्न झाले असून तिला तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्ये आहेत. तिचा पती मागील काही दिवसांपासून सतत दारूच्या नशेत पत्नीशी भांडण करत होता.

पतीच्या या त्रासाला कंटाळून संबंधित महिला आपल्या चारही मुलांना घेऊन आई-वडिलांकडे माहेरी राहत होती.

रात्री घराबाहेर पडली अन् गायब झाली

३० ऑगस्टच्या रात्री महिला, तिची मुले आणि तिचे आई-वडील असे सर्वजण घरात झोपले होते. त्यावेळी नववीच्या वर्गात शिकणारी तिची अल्पवयीन मुलगी शौचास जाण्यासाठी घराबाहेर पडली.

दरवाजाची कडी उघडल्याचा आवाज झाल्याने मुलीची आई जागी झाली. तिने घराबाहेर येऊन पाहिले असता मुलगी तेथे दिसली नाही.

यावेळी एका सिल्व्हर रंगाच्या स्विफ्ट कारमधून मुलीला नेण्यात आल्याचे तिच्या लक्षात आल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून शोध सुरू

घटना लक्षात आल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी मुलीचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र, बराच शोध घेऊनही मुलगी सापडली नाही.

यानंतर मुलीच्या आईने केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

मुलीच्या आईच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

अपहरण झालेली मुलगी अल्पवयीन असून ती नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. पोलिसांनी तिच्या शोधासाठी नागरिकांकडून मदतीचे आवाहन केले आहे.

मुलीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा ती कुठे आढळून आल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण यांनी केले आहे.

दरम्यान, मुलीला नेण्यासाठी वापरल्याचा संशय असलेल्या वाहनाबाबतही पोलिसांकडून तपास केला जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास केज पोलीस करत आहेत.