Tomato Price Crisis : एकीकडे पावसाने दिलेली दडी आणि दुसरीकडे शेतमालाला मिळणारा मातीमोल भाव, या दुहेरी संकटामुळे बीड जिल्ह्यातील बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील हणमंतवाडी येथील शेतकरी महादेव कराड यांच्यावर टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने तब्बल चार एकरांतील उभे टोमॅटोचे पीक नष्ट करण्याची वेळ आली आहे. टोमॅटोच्या लागवडीपासून फवारणीपर्यंत तब्बल दोन लाख रुपयांचा खर्च झाला. मात्र, या पिकातून त्यांच्या हातात केवळ 40 हजार रुपये उत्पन्न आले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: Financial Freedom साठी नेमके किती पैसे लागतात?
तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती
महादेव कराड यांनी मे महिन्यात चार एकरांत टोमॅटोची लागवड केली होती. सुरुवातीला नांगरणी, काठी करणे आणि रोपांची लागवड करून पाण्याचीही कसातरी व्यवस्था करण्यात आली. चार एकरांतून जवळपास 400 कॅरेट टोमॅटो निघाले. मात्र, बाजारात टोमॅटोला अपेक्षित भाव मिळाला नाही. निजामाबाद, तेलंगणा आणि कर्नाटक या बाजारपेठांमध्ये टोमॅटो पाठवताना एका कॅरेटमागे 50 ते 60 रुपये वाहतूक खर्च येत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. त्यात टोमॅटोला 80, 100 किंवा 120 रुपये कॅरेट असा भाव मिळत असल्याने तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे.
हेही वाचा : भाजप नेत्याच्या सुनेनं संपवलं जीवन, पतीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप
पुन्हा कर्जबाजारी होऊन दुसरे पीक घेण्याची तयारी करावी लागणार
भाव मिळत नसल्याने उभे पीक उपटून टाकण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे महादेव कराड यांनी सांगितले. पीक काढण्यासाठी महिलांसह मजूर कामाला लावावे लागत असून, पाच हजार रुपये रोजाच्या मजुरीसह एकूण सहा दिवसांचा खर्च होणार आहे. त्यासाठी जवळपास 30 हजार रुपये मजुरी जाणार आहे. दोन लाख रुपये खर्च करून केवळ 40 हजार रुपये उत्पन्न मिळाल्यानंतर आता पुन्हा कर्जबाजारी होऊन दुसरे पीक घेण्याची तयारी करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. टोमॅटोला योग्य भाव मिळाला असता तर दोन ते तीन लाख रुपये मिळाले असते आणि खर्चही निघाला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पावसाअभावी सोयाबीन वाळून चालले असून, टोमॅटोला भाव नसल्याने मोठे नुकसान होत असल्याचे शेतकरी महादेव कराड यांनी सांगितले. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि मदतीच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात विमा, अनुदान किंवा कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. टोमॅटोचा कॅरेटचा भाव 200 रुपयांवरून 120 आणि आता 80 रुपयांपर्यंत खाली आल्याने शेती परवडत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे काळजावर दगड ठेवून चार एकरांतील उभे टोमॅटोचे पीक उपटून टाकण्याची वेळ महादेव कराड यांच्यावर आली आहे.
ADVERTISEMENT












