MPSC पेपर लीक : सहा नेते, असंख्य फोटो..सुनील गाढवेचे कोणत्या नेत्यासोबत संबंध?

मुंबई तक

29 Aug 2026 (अपडेटेड: 29 Aug 2026, 12:48 PM)

गाढवे यांच्या पत्नीचा MPSC मध्ये 32वा नंबर कसा आला? सहा नेते, असंख्य फोटो… नेत्यांसोबत संबंध काय? MPSC भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि निकालांवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सुनील गाढवे यांच्या पत्नीला MPSC मध्ये मिळालेल्या 32व्या क्रमांकाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Sunil Gadhave EXCLUSIVE

Sunil Gadhave EXCLUSIVE

Google CTA

बातम्या हायलाइट

point

MPSC पेपर लीक : सहा नेते, असंख्य फोटो..

point

सुनील गाढवेचे कोणत्या नेत्यासोबत संबंध?

Sunil Gadhave EXCLUSIVE : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध प्रशासन (FDA) परीक्षा पेपरफुटी प्रकरणी मोठा गदारोळ उठला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी आता मुंबई क्राईम ब्राँचच्या डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. आयोगाने पेपर फुटल्याची बाब अधिकृतपणे मान्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या प्रकरणात मुख्य संशयित आणि दलालांच्या शोधासोबतच, विविध राजकीय नेत्यांसोबत फोटो व्हायरल झालेले एमपीएससी अभ्यासक व विद्यार्थी प्रतिनिधी सुनील गाढवे यांचे नाव सध्या राज्यभरात जोरदार चर्चेत आले आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही बाजूंच्या राजकीय नेत्यांनी एकमेकांवर या प्रकरणातील व्यक्तींशी संबंध असल्याचा आरोप करत राजकीय चिखलफेक सुरू केली आहे.

हे वाचलं का?

राजकीय पक्षाशी संबंध नाही

सुनील गाढवे यांनी स्वतःवर होणारे सर्व आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडली आहे. गेल्या दहा वर्षांपासून एमपीएससीचा अभ्यास करत असताना, विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठीच विविध पक्षांच्या नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना भेटावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले. अभिमन्यू पवार, रोहित पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत असणारे फोटो हे केवळ विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलनांच्या संदर्भात भेटल्यामुळे काढलेले असून, आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट संबंध किंवा सदस्यत्व नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पोलीस प्रशासनाने अद्याप आपल्याला चौकशीसाठी बोलावलेले नाही अथवा अटक केलेली नाही, त्यामुळे केवळ फोटोंच्या आधारे आपल्याला टार्गेट केले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा : निवडणुका झाल्या तर ठाकरे-शिंदे-पवारांना किती जागा?

पत्नीबद्दल काय म्हणाले?

या संपूर्ण वादात सुनील गाढवे यांच्या पत्नी पायल लांडे यांच्या गुणवत्तेवरूनही सोशल मीडियावर संशय व्यक्त केला जात आहे. रद्द झालेल्या याच परीक्षेतील गुणवत्ता यादीत त्यांचा 32 वा क्रमांक आल्याने सोशल मीडियावर विविध दावे केले जात होते. त्यावर स्पष्टीकरण देताना गाढवे म्हणाले की, विरोधकांकडून केवळ अर्धी माहिती आणि सिरियल नंबरचा स्क्रीनशॉट व्हायरल करून भ्रम निर्माण केला जात आहे. आपल्या पत्नीने स्वतःच्या मेहनतीने आणि कष्टाने हे यश मिळवले असून, एमपीएससीच्या अभ्यास पद्धतीची पूर्ण माहिती असल्यामुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

हे ही वाचा : Personal Finance: Home Loan घेताना लोक करतात या 5 मोठ्या चुका...

खाजगी कोचिंग क्लासेस आणि मध्यस्थ यांचीच मुख्य भूमिका

पेपरफुटीच्या संपूर्ण साखळीवर बोलताना सुनील गाढवे यांनी यामागे कुठलाही राजकीय वरदहस्त असावा असा संशय फेटाळून लावला. प्राथमिक दृष्टीने यामध्ये काही खाजगी कोचिंग क्लासेस चालवणारे आणि मध्यस्थ (मेडिएटर्स) यांचीच मुख्य भूमिका असल्याचे दिसते, असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या पोलीस प्रशासन आणि सीआयडी या प्रकरणाचा तपास करत असून, तपासाअंतीच या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार समोर येतील. आयोगाने आपली चूक मान्य केल्यामुळे आता पुढे कोणती ठोस कारवाई होते आणि या प्रकरणातील दोषींवर काय पावले उचलली जातात, याकडे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.