MPSC drug inspector recruitment paper leak : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागातील औषध निरीक्षक (गट-ब) पदाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटल्याची पहिली तक्रार 23 मार्च रोजी एफडीएकडे करण्यात आली होती. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर 21 जुलै रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) ई-मेलद्वारे पेपरफुटीची तक्रार करण्यात आली. त्यावेळीही पेपर फुटल्याचा आरोप नाकारण्यात आला. मात्र, मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात तब्बल 155 दिवसांनी पेपरफुटी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी एमपीएससीचा अवर सचिव अभिजित लेंडवे, दोन सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील, पेपर खरेदी करणाऱ्या विद्यार्थिनी ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि तक्रारदार गौरव पाटील यांचाही अटकेतील आरोपींमध्ये समावेश आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मॉडेलवर घरात घुसून चाकूने सपासप वार, जीम ट्रेनरने कशामुळे केली हत्या?
10 प्रश्न चुकीचे सोडवण्यास सांगितले, ऋतुजाने गौरवला पाठवली पीडिएफ
या पेपरफुटीचे प्रकरण ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या प्रेमप्रकरणातील वादातून समोर आल्याची माहिती आहे. 20 मार्च रोजी ऋतुजाला एका अॅपवर प्रश्नपत्रिका पाठवण्यात आली होती. तिने ती डाउनलोड न करता बॅकअप म्हणून तिचा बॉयफ्रेंड गौरवला फॉरवर्ड केली. ऋतुजाने ‘इम्पॉर्टंट’ असे लिहून 25 पानांच्या पीडीएफचे स्क्रीनशॉट गौरवला पाठवले होते. 20 मार्च रोजी रात्री 10.55 ते 11.48 या वेळेत झालेल्या संवादात ऋतुजाने हा प्रश्नपत्रिकेचा संच आपल्याला दिल्याचे सांगितले. त्यातून मुद्दाम 10 प्रश्न चुकीचे सोडवायला सांगितल्याचेही तिने नमूद केले होते. याच संवादात तिने कौटिल्यकडून दुसऱ्या दिवशी 5 लाख रुपये मागितले जात असल्याचे सांगितले. तिचे वडील पैसे कुठून आणायचे, यामुळे टेन्शनमध्ये असल्याचेही तिने गौरवला सांगितले.
हेही वाचा : नंदुरबारमध्ये सुरू झालेली प्रेम कहाणी FDA च्या पेपर फुटीपर्यंत कशी गेली?
कौटिल्यच्या संचालकाने MPSC तील कर्मचाऱ्यांकडून विकत घेतला पेपर
या प्रकरणात नंदुरबारच्या कौटिल्य कोचिंग क्लासचा संचालक प्रवीण पाटील याने आयोगातील कर्मचाऱ्याकडूनच पेपर विकत घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर प्रत्येकी 20 लाख रुपयांत सौदा झाल्याचे सांगण्यात आले असून, पेपर देण्यापूर्वी प्रत्येकी 5 लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून मागण्यात आले होते. 22 मार्च रोजी परीक्षा झाल्यानंतर दुपारी 12 वाजून 28 मिनिटांनी ऋतुजाने पेपर देणाऱ्या व्यक्तीशी फोनवर संपर्क साधला. त्यावेळी दिलेल्या प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 90 प्रश्न पर्यायांसह तंतोतंत परीक्षेत आल्याचे तिने सांगितल्याची माहिती आहे. त्यापैकी 78 प्रश्न आपण निश्चितपणे सोडवल्याचे आणि उर्वरित प्रश्न अंदाजाने सोडवल्याचेही तिने सांगितले. याच काळात ऋतुजाने गौरवला सांगितलेल्या माहितीनुसार, तिने संबंधित पेपरमधील प्रश्न तपासले होते. गौरवनेही प्रश्नपत्रिका मिळाली असेल तर ती चेक करून किती प्रश्न बरोबर येतात ते पाहण्यास सांगितले होते.
यानंतर ऋतुजा आणि गौरव यांच्यात वाद सुरू झाले आणि पुढे दोघांचे ब्रेकअप झाले. ऋतुजा अधिकारी होणार असल्याने तिच्या घरच्यांकडून लग्नासाठी वेगळी स्थळे पाहिली जातील, अशी चर्चा दोघांमध्ये होत असल्यानेही मतभेद वाढल्याचे सांगितले जाते. या प्रेमसंबंधातील वादातूनच पुढे पेपरफुटीचा प्रकार समोर आल्याची माहिती आहे. दरम्यान, ऋतुजाने व्हायरल केलेले 85 प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, पेपरफुटीच्या आरोपांदरम्यान एमपीएससीने 26 जुलै रोजी पेपर फुटल्याची अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. आता मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात पेपरफुटी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर एमपीएससीवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणानंतर एमपीएससीने औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पेपरफुटी प्रकरणात अटकेतील आरोपींमध्ये एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांचा समावेश आहे. याशिवाय विद्यार्थिनीचे वडील अमृत पाटील, कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील आणि तक्रारदार गौरव पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे. 23 मार्च रोजी एफडीएकडे झालेल्या पहिल्या तक्रारीपासून ते मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात पेपरफुटी उघडकीस येईपर्यंत 155 दिवसांचा कालावधी गेला. या संपूर्ण प्रकरणात 20 मार्च रोजी प्रश्नपत्रिका ऋतुजाकडे पोहोचणे, ती गौरवला फॉरवर्ड होणे, 22 मार्चच्या परीक्षेत प्रश्न तंतोतंत येणे, त्यानंतर दोघांमध्ये वाद आणि ब्रेकअप होणे, तसेच 23 मार्च आणि 21 जुलैच्या तक्रारींची नोंद होणे या घटनांमधून पेपरफुटीचे प्रकरण पुढे आले.
ADVERTISEMENT












