हॉटेलमध्ये आगीचे लोट, बाहेर पडता येईना; शेवटी खिडकीतून उड्या; 21 जणांचा मृत्यू

Delhi Hotel Fire News : दिल्लीतील मालवीय नगरमधील हॉटेल फ्लॉरिस स्टे मध्ये आगीचा भडका उडला. यामध्ये 21 जणांचा मृत्यू झालाय. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचं उघड झालंय.

Delhi Hotel Fire News

Delhi Hotel Fire News

मुंबई तक

03 Jun 2026 (अपडेटेड: 03 Jun 2026, 03:39 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

हॉटेलमध्ये आगीचे लोट, बाहेर पडता येईना

point

शेवटी खिडकीतून उड्या; 21 जणांचा मृत्यू

Delhi Hotel Fire News : दिल्लीतील मालवीय नगर स्थित हॉटेल फ्लॉरिस स्टे मध्ये बुधवारी (दि.3) सकाळी लागलेल्या भीषण आगीमुळे एक मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून, अनेक लोक गंभीररित्या भाजले गेले आहेत. आग लागल्यानंतर हॉटेलमधील परिस्थिती अत्यंत भयावह झाली होती. 

हे वाचलं का?

हेही वाचा : सोलापूर : बायकोच्या अनैतिक संबंधांना वैतागला, 6 मिनीटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन्...

जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उड्या

आपला जीव वाचवण्यासाठी हॉटेलमध्ये अडकलेल्या काही लोकांनी इमारतीच्या वरच्या मजल्यांवरून खाली उड्या मारल्या, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढला. आगीची तीव्रता इतकी होती की, काहींना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. संयुक्त बचाव मोहिमेद्वारे सुमारे 40 हून अधिक लोकांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले, ज्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. 

हेही वाचा : रोहित पवारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, नवी मुंबईत काय घडलं?

हॉटेलमधील सुरक्षेच्या त्रुटींवरून प्रश्नचिन्ह

पोलीस प्रशासनाने या अपघाताची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. दरम्यान, हॉटेलमधील सुरक्षेच्या त्रुटींवरून मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हॉटेलमध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी केवळ एकच मुख्य दरवाजा असल्याने ही दुर्घटना भीषण रूप धारण करू शकली, असे प्राथमिक निरीक्षणातून समोर आले आहे.

प्रत्यक्षदर्शी अंजुम यांनी या घटनेबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आगीची सुरुवात हॉटेलच्या बेसमेंट किंवा ग्राउंड फ्लोरपासून झाली. धूर सर्वत्र पसरल्यामुळे आत अडकलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्या तोडून तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या मारल्या. सर्वात गंभीर बाब म्हणजे, अग्निशमन दलाला सकाळी 8 वाजता वारंवार फोन करूनही दलाच्या गाड्या सकाळी 9:40 च्या सुमारास पोहोचल्या. जर अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई केली असती, तर इतक्या मोठ्या संख्येने होणारे मृत्यू नक्कीच टाळता आले असते, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

स्थानिक नागरिकांनी हॉटेल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. हॉटेलमध्ये कोणताही आपत्कालीन मार्ग (इमर्जन्सी एक्झिट) नव्हता, सुरक्षा व्यवस्था नव्हती आणि एका मजल्यावर क्षमतेपेक्षा जास्त खोल्या तयार करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या इमारतीला अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र (NOC) कसे मिळाले? हा आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.