सोलापूर : बायकोच्या अनैतिक संबंधांना वैतागला, 6 मिनीटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन्...

Solapur Crime News : सोलापुरात पत्नीच्या विवाहबाह्य संशयातून आणि कौटुंबिक तणावातून 38 वर्षीय पतीने आत्महत्येपूर्वी 6 मिनिटांचा व्हिडिओ संदेश रेकॉर्ड करून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Solapur Crime News

Solapur Crime News

मुंबई तक

03 Jun 2026 (अपडेटेड: 03 Jun 2026, 12:29 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूर : बायकोच्या अनैतिक संबंधांना वैतागला

point

6 मिनीटांचा व्हिडीओ शूट केला अन्...

Solapur Crime News : सोलापूर शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आणि पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका 38 वर्षीय विवाहित पुरुषाने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. जाकीर अब्दुल्ल रज्जाक पटेल असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार का घेतली?

पत्नीसाठी 6 मिनिटांचा व्हिडिओ बनवून पतीची आत्महत्या

धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी जाकीर पटेल यांनी आपल्या पत्नीच्या नावे तब्बल सहा मिनिटांचा एक व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मनातील वेदना आणि आत्महत्येसाठी कारणीभूत असलेल्या परिस्थितीचा उलगडा केला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर सोलापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मृताच्या नातेवाईकांनी पत्नीवर आणि तिच्या संबंधित व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा : ‘भाजप शिवसेनेला संपवेल..’,शिंदेंचा आणखी एक आमदार भडकला; काय घडलं?

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना वैतागला 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जाकीर पटेल यांनी आपल्या घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जाकीर यांना त्यांच्या पत्नीचे एका अनोळखी व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा दाट संशय होता. याच विषयावरून पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार खटके उडत होते आणि मोठे वाद होत होते. नातेवाईकांचा असा आरोप आहे की, पत्नीच्या संशयास्पद संबंधातील संबंधित व्यक्तीने जाकीर पटेल यांना सर्वांसमक्ष चापट मारून अपमानित केले होते, ज्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते.

झालेला अपमान आणि सततच्या कौटुंबिक तणावामुळे जाकीर पटेल मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचले होते. पत्नीशी असलेल्या वादातून त्यांना झालेला त्रास आणि अपमान त्यांना सहन झाली नाही, म्हणूनच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. जाकीर यांनी आत्महत्येपूर्वी तयार केलेला सहा मिनिटांचा व्हिडिओ त्यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांच्या हाती लागला आणि त्यातील मजकूर ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती दिली असल्याचे समजते, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. जाकीर पटेल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्यांनी रेकॉर्ड केलेला तो सहा मिनिटांचा व्हिडिओ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या व्हिडिओच्या आधारे तसेच नातेवाईकांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलीस तपासात नेमके काय सत्य समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.